लातूर (विशेष प्रतिनिधी):
लातूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान च्या भव्य उद्घाटन प्रसंगी माजी खासदार व संसदरत्न डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ‘प्रथम राष्ट्र, शेवटी स्वतः’ या विचारसरणीने कार्य करतो. हाच विचार देशाच्या प्रगतीचा खरा पाया आहे.”
या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळ आणि छत्रपती संभाजी महाराज मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून, शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांसाठी निवासी स्वरूपात हे शिबिर पार पडत आहे. शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटी, नेतृत्व कौशल्य, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रहिताच्या मूल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

डॉ. गायकवाड पुढे म्हणाले की, “आजच्या काळात राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीचे माध्यम आहे. भाजपा कार्यकर्ता हा समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी समर्पित असतो. अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि स्पष्ट दिशा निर्माण होते.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर भाजपा जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर होते. यावेळी नगरसेविका प्रेरणा होनराव, तुकाराम गोरे, आनंद बारपुते, संजय गीर, नगरसेविका रागिणी यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याने प्रशिक्षण महा अभियानाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून, आगामी काळात या शिबिरातून सक्षम, समर्पित आणि राष्ट्रहितासाठी कटिबद्ध कार्यकर्ते घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
