Dr. Rajendra Singh

भारत विश्वगुरु नाही तर नकलची आहे – राजेंद्र सिंह

आपल्या नद्यांना मुक्तपणे वाहू द्या, तरच ही भूमी स्वस्थ राहिल. सध्या देशातली भूजल पातळी चिंताजनक पद्धतीने कमी झाली आहे.


मुंबई : आपण मोठ्या गर्वाने म्हणतो, आम्ही विश्वगुरू आहोतच, प्रत्यक्षात आपण तसे नाही. जोपर्यंत आपण पंचमहाभुतांचे महत्त्व ओळखून वागत होतो, तोपर्यंतच आपण विश्वगुरू होतो. त्यामुळे आता आपण विश्वगुरू नाहीत, या गोष्टीचा स्विकार करा, असे आवाहन जलपुरूष राजेंद्र सिंह यांनी आज मुंबईत केले.


अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने कॅन्सरमुक्त भारत या कार्यक्रमाअंतर्गत ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेला आजपासून (३१ जानेवारी) सुरूवात करण्यात आली आहे. मुंबईतल्या विलेपार्ले इथ आयोजित एका कार्यक्रमात राजेंद्र सिंह बोलत होते.


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जलपुरूष राजेंद्र सिह, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अनिल डिक्रुझ, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी, दिल्लीचे पीटर सिंग आणि नीनो कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहीमेला सुरूवात झाली.


सुशिक्षित लोकं जिथं मोठ्या संख्येने राहतात, तिथे कॅन्सर अधिक प्रमाणात होतो. कारण सुशिक्षितांच्या परिसरातल्या नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. भारतात एकही नदी अशी नाही की जिचं पाणी ओंजळीतून आपण पिऊ शकतो. जिथे पाणीच दूषित आहे, तिथे शुद्ध अन्न कसे मिळेल, असा प्रश्न राजेंद्र सिंह यांनी उपस्थित केला. नद्यांचे नाल्यात रुपांतर करण्याचे काम सर्वात आधी या देशात मुंबईने केले, असा आरोपही सिंह यांनी केला.


भ-भूमी, ग-गगन,वा-वायू, न-नीर(पाणी) अर्थात भारतीयांना जोपर्यंत या भगवानचे महत्त्व माहिती होते, त्यांचे आचरण तसे होते, तोपर्यंत भारतात कॅन्सरचा रुग्ण नव्हता. या भगवानला विसरलो तेव्हापासून कॅन्सरला आल्याचे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.
जोपर्यंत आपण पंचमहाभुतांचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागत होतो, तोपर्यंतच आपण विश्वगुरू होतो. पण सध्या आपण विश्वगुरू नाही, याचा आधी स्विकार केला पाहिजे. आपण आता विश्वगुरू नाही तर नकलची झालो आहोत. दुसरीकडून आलेल्या शिक्षेलाच आपण विद्या मानून बसलोय, त्यामुळेच मागे पडल्याची खंत सिंह यांनी व्यक्त केली.


कॅन्सर दूर करायचा असेल तर ज्या पंचमहाभुतापासून आपण बनलोय, त्याच्यासोबत आपला व्यवहार कसा आहे, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. होश मध्ये येण्याआधी पंचमहाभुतांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. या भूमीला स्वस्थ ठेवण्याचे नियोजन आपण सर्वात आधी केले पाहिजे.


आपल्या नद्यांना मुक्तपणे वाहू द्या, तरच ही भूमी स्वस्थ राहिल. सध्या देशातली भूजल पातळी चिंताजनक पद्धतीने कमी झाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकेंद्रीकरणाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निसर्गावर प्रेम करा आणि कॅन्सरपासून दूर रहा, असा सल्लाही सिंह यांनी उपस्थितांना दिला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *