वायू प्रदूषण नियंत्रणासाठी राबविलेल्या ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण’ मोहिमेत ५७० मेट्रिक टन कचऱ्याचे निर्मूलन

• ९५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू व १८ मेट्रिक टन राडारोडाही संकलित
• १८८८ किमी लांबीच्या ६७६ रस्त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता
बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगरे) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत ५७० मेट्रिक टन कचरा, ९५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू व १८ टन राडारोडाचे निर्मूलन करण्यात आले. तर, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची एकूण १,८८८ किलोमीटर लांबीच्या ६७६ रस्त्यांची सखोल स्वच्छता केली. या मोहिमेसह बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) सातत्याने सुधारणा होत आहे.
वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात विविध उपाययोजना केल्या जात आहे.
याच पार्श्वभूमीवर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ आयोजित करण्यात आली होती. घनकचरा विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षकांना नियमित स्वच्छता आणि देखभालीसाठी किमान तीन प्रमुख रस्ते किंवा मार्ग दत्तक घेण्याचा उपक्रम महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाशी सांगड घालत कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५, असे तीन दिवस विशेष अशी ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’हाती घेण्यात आली.
या अंतर्गत रस्त्याच्या पृष्ठभागाची संपूर्ण स्वच्छता करणे; रस्त्यावर पडलेले टाकाऊ पदार्थ, बांधकाम राडारोडा आदींचे निर्मूलन करणे; दुभाजक, पदपथ व सेवा रस्ते स्वच्छ करणे आदी कार्यवाही करण्यात आली. महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागात (वॉर्ड) कार्यरत २२० कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मुंबईतील सुमारे १,८८८ किलोमीटर लांबीच्या ६७६ रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यासाठी १४ हजार १३८ स्वच्छता कर्मचारी २ हजार ६३ यंत्रसामग्रीसह कार्यरत होते. रस्ते धुण्यासाठी १६३ पाण्याचे टँकर, फवारणीसाठी ११९ मिस्टिंग संयंत्राचा वापर करण्यात आला. या मोहिमेत एकूण ५७० मेट्रिक टन कचरा, ९५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू व १८ टन राडारोडाचे निर्मूलन करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *