Bokya Satbande I ‘बोक्या सातबंडे’ च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी

‘बोक्या सातबंडे’ च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी

लवकरच ‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या बालनाट्याचा ७५ प्रयॊग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात  २३ मे ला रंगणार आहे.

लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप थिएटरची निर्मिती असलेले ‘बोक्या सातबंडे’ या नाटकास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आगळावेगळा विषय आणि त्याच्या उत्तम सादरीकरणामुळे हे बालनाट्य लहान मुलांबरोबरच इतर वयोगटामधील प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरलं आहे.

Bokya Satbande Marathi Drama
Bokya Satbande Marathi Drama

नाटकाच्या यशस्वी वाटचालीविषयी नाटकाचे निर्माते प्रणव जोशी सांगतात, “व्यावसायिक नाटकांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई, पुणे, नाशिक या व्यावसायिक नाटकांच्या त्रिकूटाबाहेर फारशी जात नाहीत; पण याला अपवाद ‘बोक्या सातबंडे’ बालनाट्य आहे. या बालनाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांबरोबरीने पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, मराठवाडा, जळगाव, औरंगाबाद याही भागात ‘बोक्या सातबंडे’ पोहोचले आहे. फक्त पोहोचले नाही तर लोकप्रियही झाले आहे.

Bokya Satbande Marathi Drama
Bokya Satbande Marathi Drama

या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे नायक बोक्या कोणत्याही फँटसीच्या जगात वावरतात नाही तो खऱ्या आयुष्यात जगत त्याला येणाऱ्या समस्यांवर तोडगे काढतो. हे नाटक मुलांना वास्तवात जगण्याची सवय लावते. पालकांनी मुलांना काय दाखवले पाहिजे याची तफावत ‘बोक्या सातबंडे’ दर्शवितो. ‘बोक्या सातबंडे’ हे समकालीन नाटक आहे. संकटांचा धीरोदात्तपणे सामना कसा केला पाहिजे याची वस्तुपाठच या कलाकृतीतून मिळतो. या नाटकाचे प्रयोग नागपूर, गोवा, बँगलोर आणि इंदोर या शहरांमध्ये करण्यासाठी आम्हाला आमंत्रण मिळाले आहे.”

‘बोक्या सातबंडे’ची वाटचाल लवकरच ७५ व्या प्रयोगाकडून १००व्या प्रयोगाकडे होणार आहे’, अशी प्रतिक्रिया नाटकाच्या दिग्दर्शिका दीप्ती जोशी यांनी व्यक्त केली. दीप्ती जोशी सांगतात, “नाटकाची शंभराव्या प्रयोगाकडे वाटचाल होतेय याचा दिग्दर्शक म्हणून मला आनंद आहे. मिलाप थिएटरचे हे पहिले व्यावसायिक नाटक आहे. या नाटकाशी संबंधीत असणारे आम्ही या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून ते आत्तापर्यंत प्रगल्भ होत चाललो आहोत. इतके या नाटकाने आम्हाला शिकवले आहे.

Bokya Satbande Marathi Drama
Bokya Satbande Marathi Drama

बोक्याची आणि नाटकात असणाऱ्या इतर पात्रांशी मुलांची खूप गट्टी झालेली आहे. नाटक संपल्यावर मुले आवर्जून पात्रांना भेटतात. वेगवेगळ्या शहरात विखुरलेल्या आपल्या मित्रांना नाटक बघण्यास सांगतात. आमच्या कलाकृतीची लोकप्रियता इतकी वाढलीय की, लवकरच नाटकाचा १०० वा प्रयोगही सादर होईल.”

मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या ‘बोक्या सातबंडे’ चे नाट्य रुपांतर डॉ. निलेश माने यांनी केलं असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी तर, मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत.

नाटकातील गीत वैभव जोशी आणि संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. नाटकाचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनीच सेट ची उभारणी केलेली आहे. दृष्य संकल्पना प्रणव जोशी, प्रकाश योजना राहूल जोगळेकर, वेशभूषा महेश शेलार, रंगभूषा कमलेश बिचे आणि कोरिओग्राफी संतोष भांगरे यांची आहे. आरुष प्रसाद बेडेकर, यश शिंदे, सिद्धा आंधळे, सौरभ भिसे, शीवांश दीप्ती प्रणव जोशी, सागर पवार, आकाश मांजरे, प्रफुल्ल कर्णे,अमृता कुलकर्णी. या कलाकारांच्या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.

—–

Hair Treatment I केसांच्या समस्यांवर AI तंत्रज्ञानावर आधारित उपचार

डॉ. बत्राजद्वारे साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर

मुंबई : होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने रुग्णांसाठी केसांच्या समस्यांवरील उपचारांचे अधिक वेगवान, प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार आणि अचूकपणे मोजता येण्याजोगे परिणाम प्राप्त करण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर केले आहे.

डॉ. बत्राज हेल्थकेअरचे व्हाइस-चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर तसेच ट्रायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनचे पहिले भारतीय अध्यक्ष डॉ. अक्षय बत्रा म्हणाले, “डॉ. बत्राज® तंत्रज्ञानातील प्रगतीच्या बाबतीत नेहमी आघाडीवर राहिले आहे. केसांच्या समस्यांशी झगडणाऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी काम करणारे एआय हेअर प्रो हे प्रगत एआय तंत्रज्ञान प्रथमच भारतात दाखल करणे आमच्यासाठी अत्यंत खास बाब आहे. अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञान आणि होमियोपॅथीची २५० वर्षांची काळाच्या कसोटीवर उतरलेली पुरातन परंपरा यांचा मेळ साधत आम्ही आमच्या रुग्णांना सुधारित परिणाम पुरवू शकू याची आम्हाला खात्री आहे.”

ही अत्याधुनिक विज्ञानाचा वापर करणारी तसेच समस्येचा अंदाज वर्तवू शकणारी उपचारपद्धती एआयच्या क्षमतांचा फायदा करून घेते, ज्यात टाळूवरील त्वचेच्या समस्यांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी तसेच रुग्णांना जास्तीत-जास्त चांगले परिणाम मिळतील अशाप्रकारे त्यांच्या समस्येनुसार औषधोपचार सांगण्यासाठी विविध भौगोलिक प्रदेशांतील यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेल्या १५ लाख रुग्णांच्या विस्तृत डेटाबेसमधून माहिती मिळवली जाते. याखेरीज एखाद्या रुग्णाच्या बाबतीत भविष्यात केस गळतीची समस्या कशाप्रकारे वाढेल याचा अंदाज घेत वेळच्यावेळी त्यात हस्तक्षेप करण्याची क्षमताही एआय हेअर प्रोमध्ये आहे.

हेअर डायग्नोस्टिक टूलमध्ये रुग्णांच्या समस्येचे तपशीलवार आणि प्रमाण पद्धतीने अन्वेषण करण्यासाठी दोन उच्च क्षमतेच्या कॅमेरांचा वापर केला जातो, याला चार प्रकारच्या मेडिकल-ग्रेड लाइट्सची जोड असते, ज्यामुळे नुसत्या डोळ्यांना न दिसणाऱ्या छुप्या समस्याही उघड होतात आणि टाळूवरील त्वचेच्या विविध समस्यांमध्ये फरक करता येतो. प्रतिमा ३०० पट मोठी करून पाहत येत असल्याने केसांची घनता, जाडेपणा आणि केस गळण्याच्या ४० वेगवेगळ्या प्रकारांमध्ये फरक करणे शक्य होते.

प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट समस्येनुसार दिल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये होमियोपॅथीचे विज्ञान आणि केसांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय तंत्रांचा मेळ घातला जातो. केसांच्या अधिक निरोगी वाढीसाठी एआय विश्लेषणाच्या आधारे एआय न्यू हेअर बूस्टर, एआय एसटीएम बूस्टर अशा व्यक्तीविशिष्ट उपचारांचे पर्याय निवडण्यात आले आहेत. एआय हेअर प्रो वेगवान, अधिक नेमक्या आणि व्यक्तीविशिष्ट परिणामांची हमी देते व त्यातून अधिक चांगले परिणाम प्राप्त होतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा लाभ घेत ही नाविन्यपूर्ण यंत्रणा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत एखादी समस्या पुढे कोणते रूप घेईल याचा अंदाज मांडते, ज्यामुळे अचूकपणे रोगनिदान करता येतेच पण त्याचबरोबर अधिक वेगवान आणि अधिक चांगल्या परिणामांसाठी व्यक्तिविशिष्ट उपचारही देऊ करते. इतकेच नव्हे तर हे साधन रुग्णाच्या प्रगतीचा तक्ता आणि अहवाल वैज्ञानिक पद्धतीने तयार करते, ज्यामुळे मोजता येण्याजोगे परिणाम हाती येतात व त्यातून आरोग्यसेवा पुरविणारे आणि रुग्ण दोघेही अधिक स्‍वस्‍थ केस मिळविण्याच्या दिशेने चाललेल्या प्रवासासाठी अधिक सक्षम बनतात.

Buddha Jayanti I अष्टांगिक मार्गाने “निब्बाण” प्राप्त होते !

प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com
————————————————-

आज समाजाचे एकंदर चित्र पाहिल्यावर असे दिसते की, समाज हा गरीबी, अज्ञान, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, पिळवणूक, लोभ, अनैतिकता यांनी ग्रासित झाला आहे. अशा अशुध्द मानव निर्मित वातावरणात व्यक्तीचा विकास साधणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मग अशा समाजाचा विकास कितीही साधण्याचा प्रयत्न केला तरी विकास साधता येत नाही. कारण त्या ठिकाणी व्यक्तीच्या विकासाची काहीही तरतूद नाही, म्हणून असा समाज अविकसित असतो. व्यक्ती विकासाला पूर्णपणे स्वातंत्र्य देवून समाज हा विकसित व सुसंस्कृत बनविण्याचा मार्ग म्हणजे भगवान बुध्दांनी सांगितलेला “आर्य अष्टांगिक मार्ग” आहे. सम्यकदृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मान्त, सम्यक आजिविका, सम्यक व्यायत, सम्यक स्मृति व सम्यक समाधी या अंगानी परिपूर्ण असलेल्या मार्गाला भगवान बुध्द आर्य मार्ग संबोधतात. अष्टांगिक मार्गाला संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा मानल्या जातो. त्यामुळेच व्यक्तीचा सर्वांगिण विकास उपरोक्त मार्गानुसार आचरण केल्यास “निब्बाण” प्राप्त करता येते.
भोग आणि क्लेश ही जीवनाची आत्यंतिक दोन टोके टाळून यामधला सुलभ, सरळ ज्ञानाचा सन्मार्ग म्हणजे तथागतांचा मध्यममार्ग होय. या मध्यममार्गाचा तथागतांनी केलेल्या शिकवणीचा उपदेश म्हणजे धम्म. सर्वप्रथम वैशाख पौर्णिमेचे महत्व समजावून घेणे आवश्यक आहे, कारण या दिवशी सिध्दार्थ गौतमाचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी घडतात ही काही साधारण बाब नाही, हा चमत्कार ही नाही. याला एक आगळं-वेगळं महत्व आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. ज्यांचा आज आपण जन्मोत्सव साजरा करीत आहोत, अशा स्थितप्रज्ञ महामानवास त्रिवार वंदन.

विश्वबंधुत्व, समानता व मानवी स्वातंत्र्य, एकमेकांविषयी प्रेम भावना, करुणेची भावना इत्यादि मानवाच्या कल्याणासाठी हितकारक गुणतत्वे जोपासणाऱ्या विज्ञाननिष्ठ, तर्कशुध्द, निर्भेड व विशुध्द जीवन मार्गावर आधारित अलौकिक अशा पवित्र धम्माची स्थापना करणारे जगातील पहिले क्रांतिकारी महामानव म्हणजेच तथागत भगवान गौतम बुध्द होत. सिध्दार्थ गौतमाने रोहिणी नदीच्या वादातून गृहत्याग केला व परिव्रजा घेतली. कपिलवस्तुहून राजगृहास आले असता मगधधिपती राजा बिंबीसार यांनी त्याची भेट घेतली. राजा बिंबीसार यांनी सिध्दार्थ गौतमास ऐहीक सुखोपभोगाबाबत उपदेश केला आपण पुन्हा कपिलवस्तुत परतुन राज्योपभोग घ्यावा, तेथे जाणे उचित वाटत नसल्यास मी माझे अर्धे राज्य आपणांस देतो तेथे आपण राज्य करावे अशी विनंती केली, परंतू संन्यासाचा जीवन मार्ग अवलंबू नये.

तद्प्रसंगी सिध्दार्थाने राजा बिंबीसारला विचारपुर्वक गांभीर्याने खणखणीत उत्तर दिले सुख म्हणजे उपभोग, असे सर्वसाधारण मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, तसेच भुक शमविण्यासाठी अन्न हवे असते आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपडयांची आवश्यकता असते, झेापेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो, प्रवासाचा शीण होवू नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुध्दी, आरोग्य यासाठी स्नान एक साधन असते. फक्त बाहय वस्तु म्हणजेच मानवाच्या दु:ख निवारण्याची साधने नव्हती. म्हणून अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी मुलभुत गरजांना प्राधान्य न देता मानवी कल्याणाचा सुखाचा शोध घेण्यासाठी ज्ञान अर्थात शिक्षण महत्वाचे असते. मिळविलेल्या ज्ञान चिंतनातून मानवाच्या कल्याणासाठी खास जीवनमार्ग शोधला ज्ञानाने व्यक्तीचा सर्वागीण विकास घडविण्यास मदत होते, हा संदेश संपुर्ण विश्वाला तथागताने दिला.

व्यक्ति विकासासाठी मानवास शिक्षणाचे-ज्ञानाचे महत्व किती आहे, हे आपल्या देशातील अनेक महामानवाने जाणले. मानवाचे कल्याण त्याचे सुख कशात आहे. याचा शोध घेता महामानवांना आढळले की, प्रथम प्रत्येक व्यक्ति ही शिक्षित- ज्ञानी झाली पाहिजेत. शिक्षणज्ञान मानवाच्या कल्याणाचे, सुखाचे प्रमुख अंग आहे. त्याचा विकासत राजमार्ग आहे, हा राजमार्ग सर्वप्रथम जगाला दाखविला महाकारुणिक गौतम बुध्दाने. भगवान बुध्दांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू आहेत. त्यांच्या विविध पैलूंचा अभ्यास विविध अंगानी व विविध दृष्टीकोणातून होणे आज आवश्यक आहे. तथागत बुध्दाच्या व्यक्तीमत्वामध्ये ज्याप्रमाणे चुंबकीय तत्व होते, त्याचप्रमाणे त्यांचे तत्वज्ञानामध्ये असे चुंबकीय तत्व होते की, ज्यामुळे असंख्य लोक त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेले होतेच. परंतू त्याही पेक्षा कितीतरी पटीने त्यांच्या तत्वज्ञानाने, त्यांच्या तत्वज्ञानातील सभ्यतेने प्रभावित होऊन त्यांनी त्याचे अनुयायीत्व स्विकारलेले होते.

बुध्दाच्या व्यक्तिमत्वाची छाप व त्यांच्या तत्वज्ञानाची पकड इतकी मजबुत आहे की, भारत भुमीच्या या महापुत्राने केवळ भारताचाच नव्हे तर संपुर्ण विश्वालाच प्रभावित केलेले आहे. भारताच्या इतिहासामध्ये एवढा प्रतिभा संपन्न, प्रखर बुध्दिवादी, ध्येयवादी व मानवतावादी अजून कधी झालेला नाही. यापुढे देखील होणे नाही ज्याला संपुर्ण जग सन्मानपुर्वक विनम्र होत असते. बुध्द हा अशा स्वयं प्रज्ञेचा माणुस होता की, ज्याने जगाला पहिल्यांदा प्रखर बुध्दिवादाची व ध्येयवादाची शिकवण दिली. भगवान बुध्द म्हणतात, अत्त-दिपो-भव, अत्त-विरहत, अत्त-सरणी अर्थात हे मानव प्राण्यांनो स्वत:चे दिप व्हा, स्वयं प्रकाशित व्हा आणि स्वत:ला शरण जावून स्वत:चच विचरण करा, दुसऱ्या कुणालाही शरण जावू नका, दुसरा कुणीही तुम्हाला शरण जाण्या योग्य नाही तुम्ही स्वत:च स्वत:चे शरणस्थान आहात, यामध्ये जगाच्या सभ्यतेचा व संस्कृतीच्या इतिहासामध्ये भगवान बुध्दाने पहिल्यांदा मनुष्याला परा प्रवृत्ती, दैव, ईश्वर, आत्मा परमात्मा संकल्पना पासून मुक्त होण्याचा महामंत्र दिला व तो जोपासून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे.

धम्म हा जीवनाच्या विविधांगी पैलूंना स्पर्श करणारा असतो. केवळ वैयक्तिक मोक्षप्राप्ती नसुन इतर सर्व मानवाला मोक्षदाता म्हणुन हितकारक व लाभदायी ठरणारा असतो. म्हणूनच सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, नौतिकमूल्ये अशा सर्वच बाबींना स्पर्श करणारा तो मोठा वर्तुळ परिघ ठरतो. ”बुध्द आणि कार्ल मार्क्स” या विषयी काठमांडू येथील विवेचनपूर्ण भाषणात त्यांनी समाजाला पर्यायाने प्रत्येक व्यक्तिला धम्माची नितांत गरज असल्याचे सांगीतले. “धर्म ही अफुची गोळी आहे, ही कम्युनिस्टांची धारणा फोल ठरविली”. जगातील सर्वधर्म सारखेच आहेत ही धारणाही त्यांनी उखडून फेकली. बुध्दाचा धम्म हा आकाशातील अनेक ताऱ्यां पैकी कसा वेगळा आहे, त्याचे तेज कसे वेगळे आणि दैदिप्यमान आहे, हे सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्वांना आवाहन केले होते हे विसरता येत नाही.

बुध्दाचे चरित्र आणि चारित्र्य निर्मळ पाण्याच्या प्रवाहासारखे होते. तो करुणेचा महासागर होता, रंजल्या गांजल्यांचा तो कैवारी, सखा, मित्र आणि मार्गदर्शक होता. जगाच्या इतिहासात अशी माणसे अपवादात्मक असतात अशा सम्यक सम्बुध्दाला अनुसरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पुढे सर्जनशील आदर्श निर्माण केला. बुध्द-बाबासाहेब हे आमच्या सर्वकष मुक्तीचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आम्हाला सन्मार्ग उपलब्ध करुन दिला आहे, मार्गक्रमण आम्हाला करावयाचे आहे. त्यासाठी स्वयं प्रकाशित होवून आम्ही बुध्द-धम्म व संघ यांच्या प्रती एकनिष्ठ राहून धम्मचक्र प्रवर्तनाची सम्यक क्रांती गतीमान ठेवली पाहीजे. अशा महान तत्ववेत्यास त्यांच्या 2568 व्या जयंती निमित्त नमन…

एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट” अंतर्गत सातारा जिल्हा सातारा जिल्हा सरपंच संसद आयोजन

एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट” अंतर्गत सातारा जिल्हा सरपंच संसद”चे आयोजन करण्यासाठी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सातारा जिल्हा सरपंच संसद आयोजन बाबतचे पत्र देण्यात आले

कोडोली प्रतिनिधी

MIT पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या “MIT स्कुल ऑफ गव्हर्नमेंट” अंतर्गत “MIT राष्ट्रीय सरपंच संसद” स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 34 ग्रामीण जिल्ह्यात “जिल्हा परिषद” व “राष्ट्रीय सरपंच संसद”यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी-सरपंच-उपसरपंच-लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने “जिल्हा सरपंच संसद”चे आयोजन करण्यात येत आहे.
सातारा जिल्हा सरपंच संसद आयोजन बाबतचे पत्र आज जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.याशनी नागराजन यांना देण्यात आले.त्यांच्यावतीने हे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. अर्चना वाघमळे यांनी स्वीकारले.
यावेळी सौ. स्वातीताई चव्हाण सातारा जिल्हा महिला समन्वयक, श्री. विक्रम जाधव सातारा जिल्हा अध्यक्ष , सौ.मिना परमणे सातारा शहर महिला समन्वयक,सौ.राणी पाटील जावळी तालुका महिला समन्वयक, श्री.प्रशांत पाटील कराड तालुका समन्वयक, श्री.मिलिंद लोहार पत्रकार दैनिक ऐक्य हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. अर्चना वाघमळे यावेळी सौ. स्वातीताई चव्हाण ,विक्रम जाधव ,मिना परमणे ,राणी पाटील ,प्रशांत पाटील,मिलिंद लोहार

सातारा जिल्हा संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम यांची निवड

 

सातारा जिल्हा संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम यांची निवड

(कुलदीप मोहिते, कराड)

सातारा, दि. २३ : संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन यांची निवड झाली आहे.आज त्यांना निवडीचे पत्र मेजर आनंद पाथरकर सेना मेडल (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी बोलतांना कदम म्हणाले की सातारा संरक्षण समिती स्थापन करण्याची मागणी सैनिक फेडरेशनने लावून धरली, अखेर त्याला यश मिळाले़ हा सर्व माजी सैनिकांचा विजय आहे़़ शासनाने सदर समिती स्थापन केल्यामुळे आता आजी-माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीयांच्या शासनाकडे प्रलंबित तक्रारी तात्काळ सुटतील व सैनिकांना न्याय मिळणे सोपे होईल, अशा शब्दात प्रशांत कदम यांनी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्हास्तरीय समिती गठीत करणेबाबत महाराष्ट्र शासन निर्णय परिपत्रकानुसार दि.24/08/2023 रोजी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा यांचे वतीने निवेदन देऊन मागणी केली होती. निवेदनाची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दि. 5/1/2024 रोजी परिपत्रक काढून जिल्हास्तरीय समिती गठित केली आहे. या समिती मध्ये सर्व 11 तालुक्यातील माजी सैनिक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक हे समिती अध्यक्ष असतील तर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी – जिल्ह्याचे सैनिक कल्याण अधिकारी,एक महिला पोलीस अधिकारी , जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक माजी सैनिक हे सदस्य असतील.
समितीच्या कामकाजाचे स्वरूप
1) सदर समिती सैनिकांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांच्या तक्रारी बाबतचा आढावा घेईल
2) जिल्ह्यातील सैनिकांच्या पत्नीचे किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नीचे तिच्यावर अन्याय झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
3) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दर महिन्याला तालुक्याला भेट देऊन सैनिकाच्या कुटुंबावरील अन्याय अत्याचाराची माहिती घेतील.
जिल्ह्याच्या ठिकाणी संरक्षण समिती गठित झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

सौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श   – मा. डॉ. बाबुराव गुरव

लोकशासन न्युज नेटवर्क
सौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श   – मा. डॉ. बाबुराव गुरव
(कुलदीप मोहिते, कराड)
कराड, : देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत यशवंतराव चव्हाण जे यशस्वी झाले त्यामध्ये वेणूताई चव्हाण (venutai chavan)यांचे योगदान महत्वाचे आहे. वेणूताई चव्हाण म्हणजे ममत्व, वात्सल्य, त्याग, आपलेपणा आणि सोज्वळता अशा सद्गुणांचा खळाळता झरा होत्या. त्यांच्या ठिकाणी देशप्रेम आणि स्वातंत्र्य चळवळ याविषयी आदर होता. आयुष्यात आलेल्या खडतर परीस्थितीला तोंड देत वेणूताईंनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा संसार समर्थपणे सांभाळला. वेणूताईंचे वागणे-बोलणे कर्मयोग्यासारखे होते. त्यांना कसलाही मोह नव्हता. आचार, विचार व संस्कार यातूनच सौ. वेणूताईंनी बालवयातच सुशीलता व शालीनता या गोष्टींना महत्त्व दिले. समस्त महिलांनी आदर्श घ्यावे असे वेणूताई यांचे जीवन होते.” असे प्रतिपादन प्रा. डॉ. बाबुराव गुरव (जेष्ठ साहित्यिक व विचारवंत) यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे  सौ. वेणूताई चव्हाण यांच्या ९८व्या जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी “‘वेणूताई चव्हाण: एक मुक्त चिंतन” या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
        या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार बटाणे (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराड उच्च शिक्षण मंडळ) हे होते.  ते म्हणाले की, “एकविसाव्या शतकातील कुटुंबव्यवस्थेची अवस्था पाहता वेणूताई ह्या खरोखरच वात्सल्यमुर्ती होत्या. संपूर्ण कुटुंबावर मायेची पाखर घालणाऱ्या व येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांच्या सेवेत त्या दंग होत्या. दातृत्व व धार्मिक वृत्तीबरोबरच ज्ञानसंपन्न तसेच विचारसंपन्नही होत्या. आपल्या पतीच्या पदाला साजेसे असे आपले आचरण पाहिजे. यासाठी त्या शांत, संयमी, सौजन्यशीलपणे पतीव्रतेचे जीवन जगत होत्या. आजच्या महिलांनी वेणूताईंचे गुण घ्यावेत.”
        प्रमुख उपस्थिती म्हणून श्री अल्ताफहुसेन मुल्ला( जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) तसेच श्री अरुण पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) उपस्थित होते.
          सदर कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे स्वागत व  प्रास्ताविक महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ .श्रीमती एस. आर. सरोदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. पी. जाधव यांनी केले.
या समारंभास संस्थेचे विश्वस्त व सदस्य  भास्करराव कुलकर्णी तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार हे आवर्जून उपस्थित होते.
या व्याख्यान समारंभास दोन्ही महाविद्यालयाचे पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
——–