Dr. Babab Adhav : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ८ डिसेंबर.
असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. डॉ बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी होते. असंघटित कामगार, वंचित, कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले.
‘हमाल पंचायती’च्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व करत समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या निधनाने कष्टकरी समाजाचा मोठा आधारस्तंभ व मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आढाव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *