लातूर (विशेष प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांचे लातूर शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत केले. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच लातूर दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
लातूर शहरात आगमन झाल्यानंतर इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समाज सुधारक आणि राष्ट्रनिर्मात्यांच्या विचारांना वंदन करून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साहात त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात इंजि. विश्वजीत गायकवाड यांचा दीड हजार किलो फुलांच्या भव्य हाराने क्रेनच्या सहाय्याने सत्कार करण्यात आला. यावेळी आकर्षक आतिषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या अनोख्या आणि भव्य स्वागतामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले.

या कार्यक्रमादरम्यान लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनुसूचित जाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोर्चा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लातूरचे माजी खासदार व संसदरत्न डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी भूषवले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, संघटनाच्या बळावरच भारतीय जनता पार्टी आज देशातील सर्वात मोठी राजकीय शक्ती बनली आहे. इंजि. विश्वजीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती मोर्चा अधिक सक्षम होईल आणि समाजातील तरुणांना नवीन दिशा मिळेल.
कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील भाजपा आणि अनुसूचित जाती मोर्चाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा स्वागत सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
