Loksabha election I मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत आहे. मतदारांना मतदान करताना सोईचे जावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेचा लाभ घेऊन मतदारांनी आपली मतदार चिठ्ठी डाऊनलोड करावी आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्याचा मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

मतदारांना त्यांच्या मतदान क्रमांक, मतदान केंद्र, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक याची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन अँप आणि https://voters.eci.gov.in/ व https://electoralsearch.eci.gov.in/ या दोन वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना आपल्या मतदार यादीतील नाव व इतर माहिती घेता येईल तसेच मतदार चिठ्ठी सुद्धा डाऊनलोड करता येईल. या मतदार चिठ्ठीची प्रिंट आऊट घेऊन मतदानासाठी जाता येणार आहे. या मतदार चिठ्ठीसोबत भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेली 12 पैकी एक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App -VHA) – या ॲपलिकेशन द्वारे नागरिकांना मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.

खालील पायऱ्या फॉलो करून व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲपद्वारे व्होटर स्लिप डाउनलोड करू शकता :

पायरी 1: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’ डाउनलोड करावे.

पायरी 2: मतदार सेवा पोर्टल (https://voters.eci.gov.in/ ) या संकेतस्थळावर नोंदणी केली असल्यास तेथे नोंदणीकृत तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा तुम्ही मतदार सेवा वेबसाइटवर नोंदणीकृत नसाल तर ‘नवीन वापरकर्ता’ म्हणून नोंदणी करा आणि ॲपमध्ये लॉग इन करा.

पायरी 3: ‘मतदार यादीत आपले नाव शोधा’ या पर्यायावर क्लिक करा.

पायरी 4: पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘मोबाइलद्वारे शोधा’, ‘बार/क्यूआर कोडद्वारे शोधा’, ‘तपशीलांनुसार शोधा’ किंवा ‘EPIC क्रमांकाद्वारे शोधा’.

पायरी 5: आवश्यक माहिती समाविष्ट करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 6: मतदारांचे तपशील दिसेल. त्या ठिकाणच्या ‘डाउनलोड’ आयकॉनवर क्लिक करा.

वेबपोर्टलवरून ऑनलाईन मतदार चिठ्ठी (व्होटर स्लिप) अशी करा डाउनलोड

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनही आपल्याला मतदार चिठ्ठी डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.

पायरी 1: भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://voters.eci.gov.in/ व https://electoralsearch.eci.gov.in/ वेबसाइटवर लॉग इन करा.

पायरी 2: मुख्यपृष्ठावरील ‘मतदार यादीत शोधा’ (Search in Electoral Roll) टॅबवर क्लिक करा.

पायरी 3: सोबतच्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘तपशीलांनुसार शोधा’, ‘EPIC द्वारे शोधा’ किंवा ‘मोबाईलद्वारे शोधा’.

पायरी 4: आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड टाका करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 5: समोर तुमचे मतदार विवरण दिसेल. तुम्ही तुमचे तपशील बरोबर आहेत का ते तपासू शकता.

पायरी 6: मतदार तपशीलाच्या खालील बाजूस ‘मतदार माहिती छापा’ (प्रिंट व्होटर इन्फॉर्मेशन) बटणावर क्लिक करा.

डाऊनलोड झालेली मतदार माहितीची प्रिंट काढून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांची नावे ऑनलाइन मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिले आहेत. या दोन्ही माध्यमातून तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र तपशील सहजपणे पाहू शकता. यामध्ये नाव, पत्ता, लोकसभा मतदारसंघाचे नाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीमधील भाग क्रमांक व नाव आणि भाग मतदाता क्रमांक याची माहिती नमूद असते. प्रत्येकाला ऑनलाईन माध्यमातून ही मतदार स्लिप डाउनलोड करता येईल.

ठाणे जिल्ह्यातील सजग मतदारांनी आपले मतदार चिठ्ठी घेऊन येत्या 20 मे 2024 रोजी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Loksabha Electron I निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त
या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही कुठल्यातरी राजकीय पक्षाचा सदस्य असायला हवा अथवा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो.

जीवन जगत असताना ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याला आपण काही नियम घालून दिलेले असतात. त्यामुळे आपले स्वतःचे आयुष्य हे सुखकर होत असते. त्याप्रमाणेच निवडणूक लढवितांनाही भारतीय निवडणूक आयोगाने काही बंधने नियम घालून दिलेले आहेत त्याचे पालन आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि निवडणूक लढवितांना दोन्ही वेळेस केल्यास फायदाच होतो .

सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी हे महत्त्वाचे आहे. कारण, यावेळी ऐकणारा वर्ग /प्रेक्षक/ नागरिक हा मोठा असतो. त्यामुळे त्याचे पडसाद समाजात सकारात्मक तसेच नकारात्मक ही होऊ शकतात. म्हणून निवडणूक प्रचार प्रसाराच्या वेळेस राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण, हेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी भारतीय संसदेत बसून कायद्याचे राज्य चालवितात त्यावेळी त्यांना सर्वसमावेशक विचार करावा लागतो. तीच भावना त्यांनी निवडणुकीच्या काळात पक्षाचे ध्येय धोरणे मांडताना तसेच मतदारसंघातील मुद्दे मांडताना विचारपूर्वक ठेवावी.

निवडणुकीचा प्रचार-प्रसार करताना जातीपाती वरून कुठलेही आक्षेपार्य भाषण देता येत नाही. तसेच जातीचा उल्लेख करणे राजकीय पक्षांनी टाळायला हवे. कुठली एक जात श्रेष्ठ आणि कुठली एक जात निम्न असे न बोलता पक्षाचे ध्येय धोरणे अथवा भविष्यात जनतेला आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा बद्दल बोलणे जास्त सुसंगत असते.

ज्याप्रमाणे जातीपातीवर बोलणे टाळले पाहिजे त्याप्रमाणेच धर्म द्वेष न करता एखाद्या धर्माला विशेष महत्त्व न देता आपल्या संविधानामध्ये जो सर्वधर्म समभावाचा संदेश आहे तो जोपासणे आणि त्या परीने आपल्या राजकीय पक्षांचा अथवा उमेदवारांनी स्वतःचा प्रचार प्रसार करणे अपेक्षित आहे.

भारतीय घटनेच्या उद्देशिकेत सामाजिक सलोखा पाळणे असे उल्लेखित असून सामाजिक सलोखा असल्यास समाजाची प्रगतीच होते अधोगती होत नाही याचे भान निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी ठेवल्यास निवडणूक चा हा काळ सर्वांसाठी सूसह्यय आणि प्रबोधनाचा ठरेल.

निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार हे प्रभावी व्यक्तिमत्व असतात. त्यामुळे त्यांचे असंख्य फॉलोवर्स अनुयायी असतात. जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून बऱ्याच गोष्टी शिकून स्वतःच्या आयुष्यात त्याप्रमाणे वागतात. निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराने कायदा व सुव्यवस्था पालन करून त्याप्रमाणे प्रचार प्रसार केला तर आपसूकच त्यांचे फॉलोवर्स अनुयायी देखील त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था पालन करतील. त्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे हे प्रत्येक उमेदवाराचे कर्तव्य आहे.

आताचा काळ हा सामाजिक माध्यमाचा काळ आहे. माध्यमांवर लाखो फॉलोवर्स असतात जे आपल्या नेत्याला उमेदवाराला फॉलो करतात या समाज माध्यमांवर एक संदेश खूप मोठी हानी करू शकतो त्याप्रमाणे प्रबोधनही करू शकतो. त्यामुळे सामाजिक माध्यमाचा वापर करताना तो काळजीपूर्वक विशेषतः निवडणुकीच्या काळात अधिक जागरूकपणे करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याचे कुठलेही वाईट पडसाद उमटणार नाहीत.

निवडणुकीचा काळाचे वातावरण भारावलेले असते त्यामुळे शब्दच्छलाने शब्द भेद तयार होऊन एखादा वाद विकोपाला जाण्याचे नाकारता येत नाही अशावेळी कार्यकर्ता प्रवक्त्यांमध्ये स्पष्टता हवी.

अंततः सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक ही कोणासाठी आहे निवडणुकीच्या मागचा उद्देश काय आहे मतदान कशासाठी करायला हवे मतदार कोण आहे कारण संपूर्ण निवडणूक ही भारताचे नागरिक म्हणजेच मतदार ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत असे नागरिक या सर्व प्रक्रियेचा महत्त्वाचा हिस्सा आहेत. त्यामुळे मतदान का करावे यासंदर्भात जागृतीची प्रयत्न राजकीय पक्षांकडून उमेदवारांकडून होणे गरजेचे आहे. मतदार जागृती उपक्रम अधिकाधिक केल्यास मतदानाचा टक्का वाढेल आणि एका चांगल्या लोकशाहीला ते पोषक असे ठरेल त्यामुळे या सर्व निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असून मतदार जागृती त्यांच्यावतीने अधिकाधिक व्हावी असे अपेक्षित आहे.

अंजु कांबळे निमसरकर,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय बीड

ECI

Loksabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान

देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते.  निवडणूक कार्यक्रमांच्या या  घोषणेमुळे देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ५ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणूक पार पडणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील ८ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहेत. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण ११ मतदार संघांसाठी, १३ मे  रोजी चौथ्या टप्प्यात तर २० मे रोजी  राज्यातील उर्वरित १३ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल –  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

लोकसभा निवडणुकांबरोबरच देशातील विधानसभांच्या २६ जागांसाठी पोट निवडणुका होत असून यात महाराष्ट्रातील अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

देशात सात टप्प्यात मतदान

देशात 19 एप्रिल रोजी  पहिल्या  टप्प्यात 21 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 102 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी  उमेदवारी  अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

देशात 26 एप्रिल रोजी  दुसऱ्या  टप्प्यात 13 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 89 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी  उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

देशात 7 मे रोजी  तिसऱ्या  टप्प्यात 12 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 94 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी  १२ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 13 मे रोजी चौथ्या  टप्प्यात 10 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 96 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  १८ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 8 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 49 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  ३ मे  रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  २९  एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

देशात 1 जून रोजी सातव्या टप्प्यात 8 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  ७ मे  रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

ठळक मुद्दे

  • 1 कोटी 84 लाख मतदार (वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले ) देशात प्रथमच मतदाते

  • 18 ते 29 वर्ष वयोगटातील 21 कोटी 50 लाख मतदार

  • देशात 85 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 82 लाख मतदार

  • 100 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 2 लाख मतदार

  • 85 वर्षावरील व 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगता असणाऱ्या व्यक्तींसाठी देशात प्रथमच घर जावून मतदान

  • 12 राज्यात महिला मतदारांचे प्रमाण प्रति 1 हजार पुरुषांच्या तुलनेत 1 हजारापेक्षा जास्त. देशात 1 हजार पुरुषांमागे सरासरी 948 महिला मतदार

निवडणूक यंत्रणेसमोर ही चार आव्हाने : आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्यास

बळाचा प्रयोग (मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती (मिस इन्फॉर्मेशन) आणि माध्यम समन्वय समितीच्या नियमांचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाण असून यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.