सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

वाई:येथील सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात


शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे त्रिवार सत्य आहे.
श्री शिवाजी विद्यालय सुरुर या शाळेत , 1996-97 मद्ये इयत्ता दहावीत असलेले माजी विद्यार्थी शाळेमध्ये झालेल्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी किशोर चव्हाण, रणसिंग डेरे व इतर वर्गमित्र यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी 26 वर्षानंतर एकमेकांना भेटले त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रथम सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. हयात नसलेल्या मित्रांना शिक्षकांना अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहून कार्यक्रम पुढे सुरू झाला.
अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील अशा प्रकारे आपले मनोगत मनोगत व्यक्त करताना सांगितले. शिक्षकही भावुक झाल्याचे दिसून आले. या विद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले गेले डॉक्टर, वकील,पोलीस, शिक्षक, इंजिनियर, उद्योजक,पत्रकार, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, आधुनिक शेतकरी, यामुळे विद्यालयाचा गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस वाढत जात आहे असे माजी शिक्षक माधवराव डेरे यांनी सांगितले.
यावेळी विद्यालयाच्या शालाप्रमुख रश्मी बागल व माजी शिक्षक बाळकृष्ण यमगर, बबनराव चव्हाण, अविनाश चव्हाण, सुरेश पारखे, अंकुश गायकवाड, प्रकाश थोरात, आनंदराव डेरे, अरविंद रेवले, दिलीप यादव, बाळासाहेब कोलार, जावेद खान मोकाशी, अकबर मोकाशी, प्रभा प्रभाकर साबळे, हनुमंत बांदल, मनीषा पुजारी . हे शिक्षक तसेच शिक्षक सेवक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जमा झालेल्या निधीतून शाळेसाठी कायमस्वरूपी उपयोगी पडणाऱ्या वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहे.
संगीता कडाळे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन जितेंद्र चव्हाण यांनी केले.