भाजपा महायुतीच्या गुंडगिरी, भ्रष्टाचार व विकृत राजकारणाला मूठमाती द्या: हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बीड, परभणी व जालना जिल्ह्यात प्रचार सभा
बीड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास करण्यात आले आहेत. बिहारमध्ये जंगलराज आहे असा आरोप करणाऱ्या भाजपा महायुतीचा महाराष्ट्रात नंगानाच सुरु असून त्यांनी लोकशाहीला काळीमा फासला आहे. महायुतीच्या या गुंडगिरी, भ्रष्टाचार व विकृत राजकारणाला मुठमाती द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बीडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाने उच्छाद मांडला आहे, त्यांच्या गुंडगिरीने बीड जिल्ह्याचे नाव बदनाम झाले आहे, ही विकृत्ती आता थांबवली पाहिजे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत ताकदीने लढत आहे. तर महायुतीमधील पक्षच आपापसात लढत आहेत. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु असून जनतेमध्ये सत्ताधारी महायुतीविरोधात प्रचंड रोष आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसाठी उत्साह असून बीड सह मराठवाड्यातही काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली होईल असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
बोगस मतदार यादीसंदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणूक आयोग भाजपाच्या हाताखालचे बाहुले बनले आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असतात ते पुराव्यासह राहुल गांधी यांनी उघड केले आहे. राज्य निवडणूक आयोगालाही मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली पण निवडणूक आयोगाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले चिंताजनक आहे.
आघाडीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे पण मुंबईत कोणाशी आघाडी करायची याचा निर्णय मुंबई काँग्रेस घेईल.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड, परभणी व जालना जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या. परळी, पाथरी, सेलू व परतूर येथे प्रचार सभांना संबोधित करून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, माजी आमदार व परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बीड जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनावणे, प्रदेश सचिव आदित्य पाटील, शहराध्यक्ष बहादूर भाई, तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे, प्रकाश देशमुख, आदी उपस्थित होते.
