महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ आणि असंघटित कामगार संघटनांचे प्रणेते बाबा आढाव यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. देशभरातील हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, काच–पत्रा वेचक कामगार, तसेच विविध असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारधारेवर उभे राहून समाजातील तळागाळातील वंचित, शोषित आणि पीडित घटकांसाठी सतत झटणारे कृतिशील समाजसुधारक म्हणून बाबा आढाव यांनी महाराष्ट्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.
‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ – जातीय भेदाला दिला क्रांतिकारक छेद
१९७०–८० च्या दशकात महाराष्ट्रात त्यांनी राबवलेली ‘एक गाव, एक पाणवठा’ ही मोहीम जातीय भेदभावाला दिलेला प्रभावी आणि धाडसी उत्तर म्हणून इतिहासात नोंदली गेली आहे. ग्रामीण भागातील पाणीप्रश्नातून निर्माण होणारी विषमता दूर करून, समानतेचा संदेश देणारी ही चळवळ आजही सामाजिक बदलाचे प्रतीक मानली जाते.
असंघटित कामगारांचा ‘आवाज’ हरपला
बाबा आढाव यांच्या निधनामुळे असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांनी आपला खरा आधार गमावला आहे. कामगारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी त्यांनी केलेली लढाई श्रमिक चळवळीच्या इतिहासात सदैव जिवंत राहील. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक वंचित कामगारांना संघटनात्मक बळ मिळाले.
फुले–शाहू–आंबेडकरी चळवळीला मोठी हानी
त्यांच्या निधनामुळे पुरोगामी, समाजवादी आणि आंबेडकरी विचारांच्या चळवळीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे. समाजातील समानतेसाठीचे त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.
आंबेडकर परिवार आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाबा आढाव यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.