नववर्षाच्या स्वागतापूर्वी मुंबईतले हॉटेल्स, बार एफडीएच्या वॉचलिस्टमध्ये ! : नरहरी झिरवाळ

मुंबई (प्रतिनिधी)- डिसेंबर उजाडल्यानंतर मुंबईकरांकडून नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम निश्चित होऊ लागतात. नववर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबरला म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या उत्सवासाठी नागरिक सज्ज होत असतानाच मुंबईतील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्समध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छता मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) अधिकाऱ्यांकडून तेथे अचानक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली. उत्सवाच्या गर्दीत मुंबईकरांना हॉटेल्समधून चांगले अन्न मिळावे हे, या तपासणी मोहिमेचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
यंदा ३१ डिसेंबरला मुंबईत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बारमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होण्याची अपेक्षा आहे. या गर्दीच्या वेळेत अन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी, एफडीए मुंबईच्या १३ झोनमध्ये विशेष पथके तैनात करेल. या पथकांतल्या अधिकाऱ्यांकडून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
मागच्या वर्षी, मुंबईतल्या काही प्रसिद्ध हॉटेल्समध्ये अस्वच्छ स्वयंपाकघर, उंदीरांचा उपद्रव आणि एफडीए अन्नपरवाने गहाळ असल्याचे आढळून आले होते. याकरीता त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला होता आणि ही आस्थापने तात्पुरती बंद करण्यात आली होती. यावर्षी दिवाळीदरम्यान अशाच प्रकारच्या तपासणीत मिठाई, पनीर, तूप आणि सुक्या मेव्यामध्ये भेसळ रोखण्यावर लक्ष केंद्रित केले गेले होते. उत्पादकांनाही तळण्याचे तेल पुन्हा वापरण्याविरुद्ध इशारा देण्यात आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
या तपासणीचे प्राथमिक उद्दिष्ट मुंबईकरांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात दर्जेदार अन्न मिळावे याची खात्री करणे आहे. स्वच्छ आणि चांगले अन्न सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नाशी निगडीत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही युनिटवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही नरहरी झिरवाळ यांनी दिला.
एफडीएच्या या मोहिमेचा हेतू उत्सवाच्या काळात अन्न प्रतिष्ठानांमधील मालक आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढवणे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे हे आहे. जनतेला सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी भविष्यातही अशा मोहिमा राबवल्या जातील, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *