Chaityabhumi I दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा – डॉ. नितीन राऊत

 

 

अधिवेशनातच प्रस्ताव मंजूर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी

 

मुंबई दि. ०९/०७/२०२४ (प्रवीण बागड़े)

 

राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली.

 

२०१८ मध्ये राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी केलं. ओशिवारा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असं नाव दिलं. दादर स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करावं, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी करावं, अशी आग्रही मागणी डॉ. राऊत यांनी आज सभागृहात केली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादरलाच राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे अंतिम विधी येथेच झाले. त्यामुळे राज्यातल्याच नाही, तर देशातल्या आणि जगातल्या भीम अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत.

दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी यावेळी डॉ. राऊत यांनी राज्य शासनाला केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *