न्युक्लिअर बॉम्बची होड सृष्टीसाठी धोकादायक
सतपालजी महाराज यांनी दिला सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली: विकसीत देशांमध्ये जास्तीत जास्त न्युक्लिअर बॉम्बचा साठा करण्याची होड लागल्यामुळे या जगापुढे अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असल्याची भीती अध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांनी व्यक्त केली आहे. श्री हंसजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित द्विदिवसीय सद्भावना संमेलनाला संबोधित करताना हे मत व्यक्त केले.
सतपालजी महाराज म्हणाले की, 1952 मध्ये अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचा विस्फोट केला होता. यानंतर अन्य देशांमध्ये बॉम्बचे परिक्षण करण्याची होड लागली होती. अशात, श्री हंसजी महाराजांनी 1960 मध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानावर “अँटी-डॉइट— कन्व्हेन्शन”चे आयोजन करून नि:शस्त्रीकरणाचे आवाहन केले होते. आता पुन्हा आण्विक शस्त्रांची होड लागल्याचे बघायला मिळत आहे. भारताने नेहमीच शांती आणि सद्भावनेचा संदेश जगाला दिला आहे. अशात, सद्भावनेचा संदेश देण्यासाठी आपण सर्व भारतीयांना पुढे यावे लागेल, असे आवाहन सतपाल महाराज यांनी केले.

विकसीत देशांकडे शस्त्रांचा एवढा साठा झाला आहे की या पृथ्वीला एकदा नव्हे तर कितीतरी वेळा नष्ट केले जावू शकते. आधीपासून तयार बॉम्ब आणि अन्य विध्वसंकारी शस्त्रांना विद्यमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत केली जात आहेत. याचे परिक्षण केले जात आहेत आणि जाणीवपूर्वक युध्द भडकविले जात आहे. भारत भगवान राम, कृष्ण, शीख धर्मांचे दहा गुरू, महावीर वर्धमान आणि महात्मा बुद्ध यांची भूमी आहे. या भूमिचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सद्भावना संमेलनात संत ज्ञानेश्वर महाराज यांचे “ज्योत से ज्योत जलते चलो… प्रेम की गंगा बहते चलो” हे गीत वाजवण्यात आले. यावेळी सर्व दिवे बंद करण्यात आले आणि हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. यावेळी, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, कोल्हापूर, पंढरपूर अशा महाराष्ट्रातील 27 शहरातून साधूसंत उपस्थित होते.

सतपाल महाराज म्हणाले की, श्री हंसजी महाराजांनी आयुष्यभर आत्मज्ञानाचा प्रचार केला. शांती आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काम केले. सतपाल महाराज म्हणाले की, ग्लोबल वार्मिंगचे आणखी एक संकट जगापुढे निर्माण झाले आहे. हिमनद्या वेगाने वितळीत गेल्या तर समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याशिवाय राहणार नाही. याचा आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.
