मुंबई | प्रतिनिधी
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. ही कारवाई शिल्पा शेट्टी यांच्या ‘बेस्टियन हॉस्पिटॅलिटी’ (Bastian Hospitality) या कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टी या या कंपनीच्या को-ओनर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टियन हॉस्पिटॅलिटी कंपनीचे मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि गोवा येथे ‘बेस्टियन’ (Bastian) नावाने क्लब्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. आयकर विभागाला हॉटेल व्यवसायातील गुंतवणूक, उत्पन्न आणि कर भरणा (Tax Payment) यामध्ये काही अनियमितता असल्याचा संशय आहे.
त्यामुळे आयकर विभागाकडून बेस्टियन रेस्टॉरंट आणि संबंधित कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची, बँक खात्यांची तसेच कथित कर चुकवेगिरीची सखोल चौकशी केली जात आहे. या धाडीमध्ये कागदपत्रे आणि डिजिटल डेटाची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावर शिल्पा शेट्टी किंवा बेस्टियन हॉस्पिटॅलिटी कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या धाडीमागील नेमकी कारणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
