Maharashtra Loksabha Election : आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या

महिला बचतगट व शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

ठाणे – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे.यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थितांना केले.

मतदान जनजगृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये पार पडला.

शाळकरी मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे व प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आई-बाबास पत्र हा उपक्रम राबविला. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी पालकांना भावनिक साद घालत असा संदेश लिहिला की, आम्ही मत देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या! मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. तसेच विद्यार्थीवर्गाने विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर केला.

‘मतदान करा… मतदान करा… लोकशाहीचा विजय करा या संकल्पनेमधून मी मतदान करणारच आपण ही करा’ असा प्रेरक संदेश फलकावर लिहून शिक्षक व कर्मचारीवर्गांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *