Raigad I मुलं ज्या पाण्याने ‘शी’ सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते

मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांचा तीव्र संताप

रायगडच्या जनतेला सोसावे लागणारे पाण्याचे भीषण वास्तव आले समोर

रायगड (धम्मशील सावंत)

मुलं ज्या पाण्याने शी सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते,मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, असा तीव्र संताप उमटे धरण क्षेत्रातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असणाऱ्या उमटे गावातील पाण्याचे हे भीषण वास्तव आहे. उमटे आणि परिसरातील ४७ गावे तसेच ३३ आदिवासी वाड्यातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध, दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे. या पाण्यामुळे या नागरिकांच्या आरोग्यावर देखील अनेक दुष्परिणाम होतायत.

रायगडच्या जनतेला सोसावे लागणारे पाण्याचे भीषण वास्तव उमटे धरणाच्या माध्यमातून समोर आले आहे. येथील मुलं म्हणतात, “ बाबा या पाण्याने शी धुवू नको”. पण असे अशुद्ध, गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी आम्हाला दररोज प्यावे लागते. आम्ही प्रशासन स्थरावर लेखी पत्रव्यवहार केले.आंदोलन केली, मात्र धिम्म प्रशासनाला जाग येत नाही. या परिसरात दुषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांची वाढ झाली असून यापासून काही मृत्यू देखील झाल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे.

या मृत्यूंना जिल्हा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिक adv : राकेश पाटील यांनी केला आहे. तर उमटे धरण क्षेत्रातील जनतेला शुद्ध व मुबलक पाणी न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यात 24 धरणानी तळ गाठला असून जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या भागातील ऐन उन्हाळ्यातील पाण्याचे भीषण वास्तव समोर आल्याने विकासाच्या गमजा मारणारे लोकप्रतिनिधी, शासनकर्ते प्रशासन यांची देखील अब्रू चव्हाट्यावर आली आहे असे म्हटल्यास काही वावगे नाही.

अलिबाग तालुक्यातील एकमेव असलेले उमटे धरण शेवटच्या घटका मोजत आहे. धरणात गाळ साचला असून ५० हून अधिक ठिकाणी भगदाड पडली आहेत. सुमारे ४५ वर्षांपासून या धरणातील गाळ काढलेला नाही. येथील नागरिक प्रशासनाकडे अर्ज विनंत्या करतात परंतु याची दखलच घेतली जात नाही अशी खंत येथील आंदोलक तरुण नंदेश गावंड यांनी व्यक्त केली.

उमटे धरण क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे पराकोटीचा संघर्ष सुरू आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती इथं उदभवलीय. अलिबाग तालुक्यातील एकमेव असलेले उमटे धरण हे आज शेवटची घटका मोजतेयं.

धरणाच्या भिंतीची परिस्थिती अतिशय दयनिय झाली असून हे धरण पूर्णपणे गाळाने भरले आहे. त्याचे दगड निखळले आहेत. त्यामुळे सदर मातीच्या बंधार्‍याला जवळ जवळ 50 हून अधिक ठिकाणी भगदाडे पडली असून धरण पुर्ण भरल्यानंतर त्यातून पाण्याचा निचरा होत आहे.

धरणाचा बंधारा मातीचा असल्यामुळे तो कधी फुटेल याचा नेम नाही. असे झाल्यास विभागांतील सहा गावे पुर्णपणे पाण्याखाली जातील. धरण गाळाने पुर्णपणे भरलेले असून आज गेली 46 वर्षे गाळ काढलेला नाही. पाण्याची क्षमता अत्यंत कमी झाल्यामुळे 5 ते 7 दिवसाआड पाणी पुरवले जात आहे तेही दुर्गंधीयुक्त.

ढिम्म प्रशासन गली 8 वर्षे त्यांच्या नजरेत आणून सुद्धा दुर्लक्ष करीत आहे व येथील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. या प्रश्नावर येथील धरण क्षेत्रातील लोक व्यापक जन आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्क अधिकारासाठी संघर्ष करावा लागतोय ही शोकांतिका असल्याचे उमटे धरण क्षेत्रातील आंदोलकांचे म्हणणे आहे. उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याचा विषय अतिशय संवेदनशील बनलाय.

इथली राजसत्ता उलथवून टाकण्याची ताकत उमटे धरण क्षेत्रातील जनतेत असून उमटे धरणाचं पाणी आता तरुणाई पेटवणार असा इशारा उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड ने दिलाय. लोकप्रतिनिधी, शासनाची उदासीनता आणि दुर्लक्षित धोरण चीड आणणारे आहेच , याबरोबरच येथील बडे प्रकल्प असलेले आर.सी.एफ, जे.एस. डब्लू, जे. एन. पिटी प्रकल्प, एम आय डी सी यांच्यामार्फत सीएस आर फंड देखील मिळत नसल्याची ओरड आता जनतेतून होताना दिसत आहे.

उमटे धरणात साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्‍याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना निवेदन दिले.

उमटे धरणाच्या पाण्याचा आणि गाळाचा प्रश्न सुटला नाही तर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले नागरिक, महिला आता शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पाव़ित्र्यात आहेत. धरणाचा गाळ हा मोठया प्रमाणावर साचल्यामुळे डिसेंबर महिन्यातच पाणी कपातीला सुरुवात होते.

धरणावर अवलंबून असणार्‍या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. उमटे धरणाचा गाळ काढून मुबलक प्रमाणात पाणी देण्याची जबाबदारी ही शासनाचीच असताना शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय.त्यामुळे जनतेत येत्या काळात उद्रेक होण्याची चिन्ह दिसताहेत.

उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरीत झाले. त्यामुळे धरणाची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेवर आहे.
धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफुट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. सद्यस्थितीत मोठया प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता सुमारे 30 दशलक्ष घनफुट आहे. धरणाच्या पाण्यावर 47 गावे व 33 आदिवासी वाडया असून पिण्याच्या पाण्यावर ही गाव अवलंबून असून हे पाणी पुरवठा करणारे एकमेव धरण आहे.

धरणाचा गाळ हा मोठया प्रमाणावर साचल्यामुळे डिसेंबर महिन्यातच पाणी कपातीला सुरुवात होते. धरणावर अवलंबून असणार्‍या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघषर्र् करावा लागत आहे. उमटे धरणाचा गाठ काढून मुबलक प्रमाणात पाणी देण्याची जबाबदारी ही शासनाचीच असताना शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
मागच्या सन 2021 च्या पावसाळयामध्ये कोरोना काळामध्ये उमटे धरणाच्या फिल्टर प्लांटमध्ये एक आदिवासी बांधव पडून मरण पावला त्याचे प्रेत पिल्टर प्लांटमध्ये आठ दिवस कुजून पडले होते. आणि तेच कुजलेले दुषित पाणी आठ दिवस लोकांना पाजण्याचे पाप रायगड जिल्हा पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

उमटे धरणाच्या पाण्याचा आणि गाळाचा प्रश्न सुटला नाही तर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले नागरिक, महिला आता शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पाव़ित्र्यात आहेत.
पाणी पुरवठा अधिकारी या नात्याने आपण गाळ, काढण्याच्या बाबतीत जिल्हा पाणीपुरवठा विभाग, तसेच जिल्हापरिषदेला आदेश दयावेत तसेच शासनाचे तज्ञ इंजिनियर यांचे मार्गदर्शनाखाली धरणाचा गाळ काढण्यात यावा तसेच सदरचा गाळ काढण्यासाठी आपण तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा.अशी मागणी केली जातेय.

उमटे धरणाचा मागील 46 वर्षापासून गाळच काढलेला नाही. सदरचा गाळ काढून आपण नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी देण्याची नैतिक जबाबदारी आपण घ्यावी. उमटे धरणाच्या पाण्याचा आणि गाळाचा प्रश्न सुटला नाही तर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले 47 गावातील आणि 33 आदिवासी वाडयांतील नागरिक, महिला शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची मागणी उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

उमटेे धरणाचा गाळ व मुबलक पिण्यायोग्य पाणी देण्याच्या बाबतीत रा. जि. प. व लघुपाठ बंधारे विभाग अपयशी ठरला आहे. सदरच्या गाळाच्या संदर्भात प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर 47 गावे व 33 आदिवासी वाड्यांतील नागरिक शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

शासनाने पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. अन्यथा उमटे धरण प्रश्नावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा आंदोलक तथा adv राकेश पाटील यांनी दिलाय. धरणाच्या गावाच्या प्रश्नासंदर्भात उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून गावपातळीवर लोकांचे प्रबोधन केले जात असून शासनाने येथील पाण्याचा प्रश्न हा माणसांचा प्रश्न म्हणून समजून तात्काळ धरणातील गाळ काढून शासन तत्पर आहे याची पोच पावती द्यावी.

अशी मागणी जनतेतून केली जातेय.गेल्या अनेक वर्षापासून अर्ज निवेदने विनंत्या करणाऱ्या नागरिकांच्या मागणीला असंवेदनशील प्रशासनाने,तसेच लोकप्रतिनिधींनी केराची टोपली दाखवली आहे. या परिसरातील ४७ गावे आणि ३३ आदिवासी वाड्यातील नागरिकांनी एकत्रित येत तीव्र संघर्षाची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे प्रशासनाची गाळ काढण्याची मोहीम राबविण्याची तारांबळ सुरु झाल्याचे दिसते, मात्र पावसाळा तोंडावर असताना उमटे धरणातून किती गाळ निघणार हा देखील प्रश्नच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *