शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
मुंबईतील खार येथील रामकृष्ण मठ व मिशनच्या वर्षभर चाललेल्या शताब्दी वर्षाची सांगता आज बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला रामकृष्ण मिशन बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी दिव्यानंद, सहायक सचिव बलभद्रानंद, मुंबई रामकृष्ण मठाचे अध्यक्ष सत्यदेवानंद, सुशीम दत्ता, शंतनू चौधरी तसेच रामकृष्ण मठाच्या विविध केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
