नांदेड | विशेष प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेली भेट हा भारतीय सामाजिक व वैचारिक इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार, सुप्रीम कोर्टचे ज्येष्ठ वकील तथा प्राध्यापक प्रा. डॉ. ॲड. सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांनी केले.
२ जानेवारी १९४० रोजी कराड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघ शाखेला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ ‘बंधुता दिवस’ महाराष्ट्रभर विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने नांदेड शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
बाबासाहेबांचे राष्ट्रदर्शन स्पष्ट करणारे व्याख्यान
या कार्यक्रमात प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रविषयक दृष्टिकोनावर, सामाजिक भूमिकेवर आणि संवादप्रधान विचारसरणीवर सविस्तर प्रकाश टाकला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण राष्ट्र उभे करणारे महान विचारवंत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन्याय आणि शोषणाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, मात्र त्यांनी कधीही राष्ट्रविरोधी भूमिका स्वीकारली नाही.
“मी आधी आणि शेवटी भारतीय आहे,” हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण कार्यातून प्रकट होत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी नमूद केले.
संघ शाखेला भेट : संवाद आणि समरसतेचा संदेश
२ जानेवारी १९४० रोजी कराड येथील संघ शाखेला दिलेली भेट ही केवळ औपचारिक घटना नसून, ती संवाद, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात संवादाशिवाय एकता शक्य नाही, याची बाबासाहेबांना जाणीव होती. विचार आणि मार्ग वेगळे असू शकतात, मात्र राष्ट्र एकच असते, हा त्यांचा ठाम विचार या भेटीतून अधोरेखित होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बंधुता : संविधान आणि संघ यांचा समान दुवा
डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानातील ‘बंधुता’ या संकल्पनेवर विशेष भर दिला.
संविधानाच्या प्रस्तावनेत बंधुता हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक समाविष्ट केला. कारण कायदे समाज बदलू शकतात, सत्ता समाजाला दिशा देऊ शकते, मात्र समाजाला अंतःकरणातून जोडणारा घटक म्हणजे बंधुता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघही समाजजीवनात समरसता, एकात्मता आणि राष्ट्रभावना या मूल्यांवर सातत्याने कार्य करत आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आणि संघाची विचारधारा यांच्यात समाज जोडण्याचा समान धागा दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.
दलित नेतृत्व व सामाजिक जबाबदारी
या वेळी बोलताना डॉ. गायकवाड यांनी दलित नेतृत्वाच्या भूमिकेवरही भाष्य केले.संघर्ष करताना राष्ट्र तुटू देऊ नये, हक्कांची मागणी करताना समाजात कटुता वाढू देऊ नये आणि संविधान जपत समरसतेचा मार्ग स्वीकारावा, असे त्यांनी आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष हा विभाजनासाठी नव्हता, तर समावेशनासाठी होता, हे लक्षात ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी विषंभर वरवंटकर होते. तर डॉ. विठ्ठल मोरे यांनी सहवक्ते म्हणून विचार मांडले.कार्यक्रमाचे संयोजन विजय पाठक, यशपाल गवळे व सहकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमास नांदेड शहर व परिसरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजात समरसतेचा संदेश
या व्याख्यानाच्या माध्यमातून समाजात संवाद, बंधुता आणि राष्ट्रीय एकता यांचा प्रभावी संदेश देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता, ते आजच्या समाजजीवनात आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
