Pune Accident News I पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालला पोलीस स्टेशनमध्ये विशेष वागणूक कोणाच्या आशिर्वादाने ?

महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात पुण्याच्या नावलौकिकाला काळिमा फासला

मुंबई, दि. २१ मे २०२४
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दारुच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये बडदास्त राखण्यात आली. गुन्हा दाखल करताना किरकोळ कलमे लावून तातडीने रात्रीच कोर्टात हजर करुन जामीन मिळाला.

ह्या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत असून अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, पुणे अपघातातील आरोपी हा बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांतच्या भरधाव कारने दोघांना चिरडले. वेदांत हा दारुच्या नशेत कार चालवत होता तसेच त्याची पोर्शे ह्या कारला नंबरप्लेटही नव्हती. बेदरकारपणे कार चालवून दोघांना चिरडलेल्या वेदांत अग्रवालला पोलीसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला.

पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यासाठी पिझ्झा, बर्गर मागवल्याचेही समजते. एवढे गंभीर प्रकरण असताना पोलीसांनी तातडीने थातूर मातूर कलमे लावून लगेच कोर्टात हजर केले, पोलिसांनी वेदांतला वाचवण्यासासाठी एवढी तत्परता का दाखवली? पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव होता का? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत.

ज्या पोलिसांनी हे प्रकरण हाताळले त्या सर्वांना निलंबित करुन कठोर कारवाई केली पाहिजे. हीच तत्परता व विशेष वागणूक इतर नागरिकांना मिळते का ? असा संतप्त सवाल विचारून कायदा सर्वांना समान असतो याचे भानही पोलिसांना राहिले नाही असे लोंढे म्हणाले.

पुणे अपघातप्रकरणी पोलीस कारवाईवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जाग आली व चौकशी करण्याचे निर्देश दिले, हे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा प्रकार आहे.

वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे पण त्याचे कारनामे पाहता त्याच्या वयाकडे पाहण्याची गरज वाटत नाही, त्याने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. दोन तरुणांचा जीव घेतलेला असताना पोलीसांना त्याचे काहीच कसे वाटले नाही? अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या देण्यात आल्याचे पुणे पोलीस आयुक्त आता सांगत आहेत मग पोलीस काय झोपा काढत आहेत का?

महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पुणे शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी असा लौकिक आहे पण त्याला काळिमा फासण्याचे काम या महायुती सरकारने केले आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *