Mhasla Press Club I म्हसळा प्रेस क्लबचा पुढाकार, तालुक्यातील पाणी टंचाई बाबत प्रशासनाशी साधला संवाद

म्हसळा – सुशील यादव

तालुक्यातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून जलजीवन योजने अंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च करूनही टंचाई पुर्व कालावधीत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्या नसल्याने नागरीकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

योजना कार्यान्वित करण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि संबंधीत ठेकेदारांकडून नियोजनाचा अभाव आणि हलगर्जीपणा होत असल्याचे ग्रामस्थानी तक्रार अर्ज करून,दैनिक वृत्तपत्रात छापून निदर्शनास आणून दिले असता यावर कायम उपाय योजना व्हावी या उद्देशाने म्हसळा तालुका पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे.

शासकीय अधिकाऱ्यांकडे चर्चा करून तो सोडविण्यासाठी संयुक्तं बैठक घेऊन समन्वय साधला आहे.म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत तालुका तहसीलदार समीर घारे,पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव जाधव,नगर पंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,पाणी पुरवठा अभियंता यशवंत बागकर, माळी,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,प्रेस क्लब अध्यक्ष बाबु शिर्के,सचिव महेश पवार, पत्रकार उदय कळस,अशोक काते,सुशिल यादव,श्रीकांत बीरवाडकर,अंकुश गाणेकर,वैभव कळस आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांनी चर्चेत भाग घेतला होता.

Mhasla press Club
Mhasla press Club

सद्या स्थितीत टंचाई परिस्थिती असलेल्या गावांमध्ये मागणी नुसार टँकरने पाणीपुरवठा करणे हा एकमेव उपाय असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले.म्हसळा तहसीलदार समीर घारे आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे चार ग्रामपंचायती मधील गावांचे प्रस्ताव सादर केले आहेत तर आणखी सहा ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

बैठकीत पत्रकारांनी रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालय म्हसळा आणि पाणी पुरवठा ठेकेदार यांनी योजनेतील चुकीचे कामे केली असल्याचे निदर्शनास आणून दिले असता ती आता पुर्ण होणार नसल्याने म्हसळा तालुक्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.
“हर घर जल ” शासनाच्या ध्येय धोरणानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातुन राज्याच्या महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,खासदार सुनिल तटकरे यांचे विशेष प्रयत्नाने म्हसळा तालुक्यात किमान १०० कोटी रुपयांची तरतूद करून तालुक्यात अनेक गाववाडी वस्तीवर जलजीवन योजने अंतर्गत ६० योजनांना मंजुरी मिळाली आहे. यातील २१ योजना कार्यान्वित झाल्या आहेत तर काही योजनांचे काम कमी अधिक प्रमाणात झाले असल्याचे सांगण्यात आले.

मंजुर योजनेत तांत्रिक त्रुटी,स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडीअडचणी आणि योजना कार्यान्वित करण्यात ठेकेदारांनी दिरंगाई केल्याने म्हसळा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे.टँकर मुक्त म्हसळा तालुक्यात आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ तालुका प्रशासनावर आली आहे.

टँकरने मुक्त असलेल्या म्हसळा तालुक्यात पाणी पुरवठा विभागाचे योग्य समन्वय व नियोजन नसल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीने म्हसळा तहसीलदार समीर घारे,गटविकास अधिकारी श्री जाधव यांच्याकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत.पावसाळा तोंडावर जरी आला असला तरी तो बंगालमध्ये नुकत्याच आलेल्या चक्री वादळाचा परिणाम होऊन लांबणीवर जाणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

पावसाळा सुरू होण्यास बराच वेळ जाणार असल्याने तालुका प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना लागलीच पाणी पुरवठा करावा अशी रास्त मागणी तालुका प्रेस क्लबचे माध्यमातुन करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *