पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणार : शिबू राजन


पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणार : शिबू  राजन
छ. संभाजीनगर : राज्यातील प्रत्येक तरूणाला तसेच महिलांना स्वत:च्या उद्योगातून सक्षम करून भारताला आर्थिक महासत्ता निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करणार, असा ठाम विश्वास एमएसएमई पीसीआय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिबू राजन यांनी आज येथे व्यक्त केला.
सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग उभारणी तसेच विस्तारासाठी केंद्र सरकारमार्फत कार्यरत असलेल्या एमएसएमई प्रमोशन कौन्सील ऑफ इंडिया (पीसीआय)ची राज्यस्तरीय कार्यशाळा आज छ. संभाजीनगरमध्ये उत्साहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
एमएसएमईचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप सरकार यांनी एमएसएमई पीसीआयचे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिबू राजन यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अभिनंदन करून त्यांनी कमी अवधित महाराष्ट्रातील को-ऑर्डिनेटरची भलीमोठी टिम तयार केल्याबाबत कौतुकही केले.
तत्पूर्वी एमएसएमईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमित उपाध्याय यांनीही शिबू राजन यांचे अभिनंदन करून सर्व समन्वयकांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान आज दिवसभर चाललेल्या  कार्यशाळेत सहभागी झालेल्या नवनिर्वाचित समन्वयकांना शिबू राजन यांनी मार्गदर्शन केले. महिला आणि तरूणांना सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी तसेच सुरू असलेल्या उद्योगाच्या विस्तारासाठी एमएसएमई पीसीआयच्या कोणत्या योजना आहेत, त्यातून किती कर्ज मिळू शकते, त्यासाठी असलेले निकष कोणते, आवश्यक पात्रता काय, तसेच योजना राबवणा-या यंत्रणेची रचना याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले १० हजार रूपयांपासून ते २५० कोटी रूपयांपर्यंतचे उद्योगकर्ज एमएसएमई पीसीआयच्या माध्यमातून दिले जाते. केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात एमएसएमईच्या विविध योजनांकरीता तब्बल २२ हजार १३८ कोटी रूपयांची भरघोस तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यातील तरूणांना आपला स्वत:चा उद्योग उभा करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. एमएसएमई पीसीआयच्या सर्व समन्वयकांनी आपापल्या तालुका, जिल्हा तसेच विभागीय पातळीवर प्रत्यक्ष जाऊन गरजवंत, होतकरू महिला आणि तरूणांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना कर्जपुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिला आणि तरूणांना १० हजार ते १ लाख रूपयांपर्यंतचा उद्योग सुरू करण्यासाठी लागणा-या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे तारण अथवा गॅरेंटरची अट नाही. व्याजदरही किरकोळ आहे. तसेच घेतलेल्या कर्जावर तब्बल १० ते ९० टक्के सबसिडीदेखील आहे. १ लाखाच्यापुढे आणि २५० कोटी रूपयांच्या आतील उद्योगासाठी कर्ज हवे असल्यास एसबीआय बँकेच्या निकषांप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केल्यास कमी व्याजदर आणि १० ते ९० टक्के सबसिडीसह कर्ज मिळू शकते. त्यामुळे राज्यातील तरूणाईने या संधीचा योग्य लाभ घेतल्यास स्वदेशी उद्योगाातून महाराष्ट्रात उत्पादनाचा महापूर येईल. नव्या संकल्पना, नवीन संशोधन आणि नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणारी नवी श्रृंखला निर्माण होईल. त्यामुळेच भारताचे जागतिक पातळीवरील नेतृत्व अधिक दिमाखदार होईल, असा ठाम विश्वास राजन यांनी
व्यक्त केला.
यावेळी शिबू राजन यांची महाराष्ट्र राज्याच्या एमएसएमई पीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबाबत समन्वयकांच्या वतीने आनंद गायकवाड यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच हार अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. आज पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ११ महिलांसह ३० पुरूष उपस्थित होते. कार्यशाळेत अनेक समन्वयकांनी प्रश्नोत्तराच्या तासात सहभागी होत आपले प्रश्न, तसेच संभाव्य येणा-या समस्यांबाबत मांडणी केली. त्यावर शिबू राजन यांनी समर्पक मार्गदर्शन करून त्यांच्या शंका, प्रश्न आणि समस्यांचे निराकरण केले.
——


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *