Unseasonal Rain I पक्षांचा आश्रय हरपला, अवकाळी वादळी पावसामुळे पक्षांची वाताहत

घरट्यांना बाधा मात्र खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता

रायगड (धम्मशील सावंत )वादळी अवकाळी पावसाचा फटका येथील पक्षांना सुद्धा बसला आहे. येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. अनेक पक्षांची घरटी व अंडी पडली आहेत. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. मात्र पक्षांना खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता निर्माण झाली आहे.

    माणगाव येथील पक्षी व निसर्ग अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी सांगितले की मागील आठवड्यात पडलेला पाऊस पशुपक्षांसाठी गारवा घेऊन आला होता. त्यामुळे पशुपक्षी सुखावले होते. मात्र या आठवड्यात विशेषतः बुधवारी (ता.15) व गुरुवारी (ता.16) पडलेल्या वादळी पावसामुळे पक्षांची मोठी वाहतात झाली आहे. विशेषतः घरटी बांधणाऱ्या पक्षांची घरटी वादळी पावसामुळे खाली कोसळली तर काही घरटी उडाली आहेत. यामध्ये दयाळ, क्षमा, तुरेवाली पाकोळी, मैना, तांबट, बुलबुल, ब्राह्मनी व साधी घार आदी पक्षांच्या घरट्यांचा समावेश आहे.

पाकोळी पक्षाची अंडी हलकी असतात वाऱ्यामुळे या पाकोळी पक्षाची अंडी देखील उडून गेली आहे. घुबड किंवा इतर पक्षी जे झाडाच्या डोलीमध्ये घरटे करतात त्यांची घरटी सुरक्षित राहिली. मात्र काही झाडे व झाडाच्या फांद्या पडल्यामुळे त्यांच्या घरट्यांना देखील बाधा झाली. त्यांच्या प्रजनन व जीवन चक्रावर देखील परिणाम होतो.

घरट्यांना बाधा

   बरेचसे पक्षी डिसेंबर व मे महिन्यात अशी साधारण दोन वेळा घरटी बांधतात. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी पक्षी आपली घरटी बांधून पूर्ण करतात. तसेच काही पक्षांची घरटी बांधण्याची लगबग सुरू आहे. मात्र अवकाळी वादळी पावसामुळे या घरट्यांना बाधा पोहोचली आहे.

जिद्दीला सलाम

  घरट्यांची वाताहत झाली असली तरी अनेक पक्षी पुन्हा नव्या उमेदीने आपले घरटे सावरण्यास सुरुवात करतात. पाऊस स्थिर झाल्यावरती हे पक्षी आपले घरटे पुन्हा बांधतात आणि त्यामध्ये स्थिरावतात.

खाद्य व पाण्याची उपलब्धता

    अवकाळी पाऊस आला असला तरी या पावसामुळे मुंग्या व वाळवी यासारखे प्राणी सक्रीय झाले आहेत. तसेच सरडे, पाली व बेडूक हे देखील बाहेर पडतात. हे सर्व प्राणी अनेक पक्षांचे आवडीचे भक्ष असते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे पक्षांना खाद्याची मात्र चांगली उपलब्धता झाली आहे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी डबकी, नदी ओहोळ यांच्यात काही प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे पक्षांसह इतर प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण थांबली आहे.

दख्खन कडे स्थलांतरीत

   अवकाळी वादळी पाऊस सतत सुरू राहिला तर अनेक पक्षी दख्खन कडे म्हणजे पुण्याकडे स्थलांतरित होतात. या स्थलांतरामध्ये देखील त्यांची परवड होते पण स्थलांतराशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो, कारण त्यांना चांगल्या निवाऱ्याची व हवामानाची आवश्यकता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *