खवय्यांची चंगळ
रायगड (धम्मशील सावंत )
पावसाळ्याच्या सुरुवातीला भेटणारी शेवळ हि रानभाजी जिल्ह्यात सर्वत्र दाखल झाली आहे. अतिशय सकस व रुचकर असलेल्या या रानभाजीला सध्या खुप मागणी आहे. यामुळे अनेक आदिवासींना हि भाजी विकून दोन पैसे हाती मिळत आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र पर्जन्य पडल्यामुळे जंगल व डोंगर भागात शेवळ उगवली आहेत. हि भाजी तयार करण्यासाठी बोंडग्याचा पाला देखिल लागतो. कारण या पाल्यामुळे भाजी खवखवत नाही. त्यामुळे आदिवासी महिला शेवळ बरोबरच बोंडग्याचा पाला देखील जुडी सोबत ठेवतात. सध्या 20 ते 30 रुपयांना शेवळ्याची जुडी मिळत आहे. खवय्ये उपलब्ध या रानभाजीचा आनंद घेत आहेत.
भाजी कशी बनवावी?
आधी भाजी निट धुवून स्वच्छ करुन घ्यावी. त्याबरोबरच बोंडग्याचा पाला देखील स्वच्छ धुवावा. त्यानंतर भाजी नीट बारिक चिरुन घ्यावी. कांंद्या मसाल्यावर तेलात परतून घ्यावी. किंवा थपथपीत (जाड) रस्सा करावा. भाजीत चिंच, कैरी, आंबोशी किंवा कोकम घालावे त्यामुळे भाजी खवखवत नाही व चविष्ट लागते. आणि गरम गरम चपाती किंवा भाकरी सोबत खावी.
हि भाजी खाण्यास खुपच चविष्ट असते. तसेच आरोग्यास देखील उत्तम असते. केवळ याच हंगामात भाजी येत असल्यामुळे घरात आवर्जून हि भाजी बनवितो. घरातील मंडळी ती अतिशय चविने खातात. सध्या बाजारात लवकरच शेवळ उपलब्ध झाल्याने खुप आनंद होत आहे. असे लता माळी, गृहिणी, पाली यांनी सांगितले.