प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com
———————————-
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग 10 वर्षे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी काम केले. 2004 मध्ये काँग्रेस पक्षाने यूपीए सरकार मध्ये त्यांना पंतप्रधान पदाचा बहुमान दिला, 2004 पासून 2014 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर सलग 10 वर्ष त्यांनी पंतप्रधान म्हणून देशसेवा केली.
भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जात होते. तसेच त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जात होते.
मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. त्यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठा पर्यंत विस्तारलेले होते. 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1962 साली त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी.फील संपादन केली. त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स एण्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे.
डॉ. मनमोहन सिंह हे काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करीत होते. यापूर्वी ते 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली आहे. मनमोहनसिंहांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंह आणि आईचे नाव अमृतकौर. मनमोहनसिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित होते.
संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असतांना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंहांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली होती.
पंजाब विद्यापीठ व प्रथितयश दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली. या काळात युएनसीटीएडी सचिवालयात त्यांनी काही काळ काम पहिले होते. त्यातूनच त्यांची 1987 आणि 1990 या काळात जीनिव्हा येथील साउथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. त्यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यातूनच 1972 साली त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो.
1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात त्यांनी खासदारपद भूषविले होते. 1998-2004 च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पडली आहे. 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर त्यांनी पहिल्यांदा व 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात त्यांनी भारताचे अर्थ मंत्रिपद भूषविले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात त्यांची भूमिका जगभरात नावाजली जाते. हा काळ त्यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला.
त्यांच्या कारकीर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार (1987), भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी सन्मान (1995), अर्थ मंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 व 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (1956), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राईट पुरस्कार’ असे काही विशेष पुरस्कार आहेत.
याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बून सारख्या अनेक संस्थांनी डॉ. मनमोहनसिंग यांना सन्मानित केले आहे. केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही त्यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असुन 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहनसिंहांची भूमिका केली होती. या सिनेमात काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता. तसेच ‘प्रधानमंत्री’ या नावाची एक मालिका एका टी.व्ही चॅनेलवर प्रसारित झाली होती. गेल्या 65 वर्षात 13 पंतप्रधानांच्या कार्यकाळात देशात झालेले बदल मांडण्याचा हा अनोखा प्रयत्न होता. त्यातील काही भागात मनमोहन सिंग यांची देखील कथा चित्रित केली गेली होती.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अत्यंत शांत, विनम्र आणि मितभाषी व्यक्तिमत्व होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याची त्यांची क्षमता होती, हे त्यांनी अर्थमंत्री असतांना दाखवून दिले होते. त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती. त्यांच्या निधनाने भारत देशाची मोठी हानी झाली आहे.
देशाने एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ विद्वान गमावला आहे. अर्थविश्वाचा भारतीय कोहिनूर हरपला आहे. त्यांचा शांत विनम्र स्वभाव आणि अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची विद्वत्तेचा अमीट ठसा भारतीय राजकारणावर नेहमीच कायम राहील. वयोमानाशी संबंधीत आजारांवर उपचारादरम्यान शर्थीचे प्रयत्न करुनही त्यांचे प्राण वाचू शकले नाही आणि शेवटी 26 डिसेंबर 2024 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली, अशा या महान नेत्याला विनम्र, भावपूर्ण आदरांजली !