डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्काराने गौरव
— “संत चोखोबा ते संत तुकोबा: समतेचा प्रवास” या ग्रंथास राज्यभरातून दाद
नांदेड, २०२५ – समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित २० वे राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात लातूरचे माजी खासदार, साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना त्यांच्या समतावादी विचारसरणीने परिपूर्ण आणि ऐतिहासिक दृष्टिकोन मांडणाऱ्या “संत चोखोबा ते संत तुकोबा: समतेचा प्रवास” या ग्रंथासाठी “राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या भव्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे होते. समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष ईश्वर नंदापुरे त्यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. संमेलनस्थळी उपस्थित असलेले साहित्यक्षेत्रातील दिग्गज, समरसता विचारांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले प्रतिनिधी हे साक्षीदार होते या सन्मानाच्या ऐतिहासिक क्षणाचे.
कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, समरसता मंच महाराष्ट्र राज्याचे प्रमुख निलेश गद्रे, डॉ. रमेश पांडव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर परिसंवाद, कविता वाचन, पुस्तक प्रकाशन, चर्चा व व्याख्याने देखील पार पडली.
डॉ. सुनील गायकवाड यांच्या ग्रंथात महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील समतेचा विचार आणि सामाजिक न्यायाचा प्रवास अतिशय अभ्यासपूर्ण आणि रसाळ शैलीत मांडण्यात आला आहे. संत चोखोबा ते संत तुकोबा या संतांची जीवनदृष्टी, त्यांचा समतेवरील आग्रह, जातीभेदाविरोधातील संघर्ष आणि समतामूलक समाजाच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेली तपश्चर्या हे या ग्रंथाचे केंद्रबिंदू आहेत.
या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. गायकवाड म्हणाले, “साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. समतेच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणं ही आपली जबाबदारी आहे. हा पुरस्कार माझ्या लेखनाची पावती असून, तो समरसता चळवळीला वाहिलेला आहे.”
या पुरस्काराने डॉ. गायकवाड यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानास मोठा सन्मान मिळाला असून, समतेच्या चळवळीला बळ मिळाल्याचे अनेक साहित्यिकांनी यावेळी मत व्यक्त केले.
या संमेलनानंतर डॉ. गायकवाड यांना लातूर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर, नाशिक आदी जिल्ह्यांतून विविध संस्थांकडून भ्रमण ध्वनी वरून शुभेच्छ देण्यात आल्या आहेत.
हा पुरस्कार म्हणजे केवळ लेखकाचा गौरव नसून, समतेसाठी झगडणाऱ्या विचारधारेचा सन्मान आहे — आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात एक प्रेरणादायी नोंद.
सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.