आवकळी पाऊसाचा जिल्ह्यातील १६९ गावांना तडाखा

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पडणा-या बेमोसमी पावसाचा ८८७ हेक्टरला फटका बसला आहे. यात सर्वाधिक ७७० हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला, मोठे नूकसान झाले आहे. या बेमोसमी पावसामुळे १६९ गावांचा तडाखा बसला आहे. १ हजार ६०० पेक्षा जास्त शेतकरी यात बाधित झाले आहेत. या पावसामुळे शेतक-यांना कोट्यवधी रुपयांना फटका बसला आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात मोसमी पाऊस जेमतेम पडला होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा झाला नव्हता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून बेमोसमी पाऊस पडत आहे. यात वादळी वारे, विजाही पडत आहेत. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. याचा मोठा फटका शेतक-यांना बसत आहे. वीज पडल्यामुळे आतापर्यत पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच मोठ्या दुधाळ २९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. सहा लहान जनावरे दगावली आहेत. ओढकाम करणा-या दहा जनावरांनाचादेखील वजी पडून मृत्यू झाला आहे. हंगामाच्या तयारीच्या दिवसांमध्ये जनावरे दगावल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला आहे.
या बेमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. १५ दिवसांत सुमारे ७७० हेक्टर फळबाग पिकांचे नूकसान झाले आहे. यात बहुतांश आंब्याचे नुकसान झाले आहे. ९० हेक्टरपेक्षा अधिक बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर २५ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने दि. ९ ते १५ एप्रिलपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यात सात दिवसांत २११.९४ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. या नुकसानीची भरपाई करण्याकरीता ४७.२१ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या बेमोसमी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मागणीही शासनाकडे करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *