कोल्हापूर, 25 जुलै: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी 99 टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणाची पूर्ण क्षमतेची पातळी 347.50 फूट असून, सध्याची पातळी 346.90 फूट आहे. म्हणजे केवळ अर्धा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आज, शुक्रवारी रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळपर्यंत धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
सध्या धरणातून विजगृहासाठी 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजे उघडल्यास विसर्गात मोठी वाढ होणार आहे. या परिसरात शुक्रवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत 65 मिमी, तर दुपारी 4 वाजेपर्यंतच्या 10 तासांत 37 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जूनपासून आतापर्यंत एकूण 3083 मिमी पाऊस झाला आहे. धरणात सध्या 8.24 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने आणि संभाव्य विसर्ग वाढीमुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणाचे दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात.पावसाचा जोर आणि धरणातील वाढती पाणीपातळी लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.