‘बोक्या सातबंडे’ च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी
लवकरच ‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या बालनाट्याचा ७५ प्रयॊग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात २३ मे ला रंगणार आहे.
लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप थिएटरची निर्मिती असलेले ‘बोक्या सातबंडे’ या नाटकास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आगळावेगळा विषय आणि त्याच्या उत्तम सादरीकरणामुळे हे बालनाट्य लहान मुलांबरोबरच इतर वयोगटामधील प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरलं आहे.

नाटकाच्या यशस्वी वाटचालीविषयी नाटकाचे निर्माते प्रणव जोशी सांगतात, “व्यावसायिक नाटकांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई, पुणे, नाशिक या व्यावसायिक नाटकांच्या त्रिकूटाबाहेर फारशी जात नाहीत; पण याला अपवाद ‘बोक्या सातबंडे’ बालनाट्य आहे. या बालनाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांबरोबरीने पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, मराठवाडा, जळगाव, औरंगाबाद याही भागात ‘बोक्या सातबंडे’ पोहोचले आहे. फक्त पोहोचले नाही तर लोकप्रियही झाले आहे.

या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे नायक बोक्या कोणत्याही फँटसीच्या जगात वावरतात नाही तो खऱ्या आयुष्यात जगत त्याला येणाऱ्या समस्यांवर तोडगे काढतो. हे नाटक मुलांना वास्तवात जगण्याची सवय लावते. पालकांनी मुलांना काय दाखवले पाहिजे याची तफावत ‘बोक्या सातबंडे’ दर्शवितो. ‘बोक्या सातबंडे’ हे समकालीन नाटक आहे. संकटांचा धीरोदात्तपणे सामना कसा केला पाहिजे याची वस्तुपाठच या कलाकृतीतून मिळतो. या नाटकाचे प्रयोग नागपूर, गोवा, बँगलोर आणि इंदोर या शहरांमध्ये करण्यासाठी आम्हाला आमंत्रण मिळाले आहे.”
‘बोक्या सातबंडे’ची वाटचाल लवकरच ७५ व्या प्रयोगाकडून १००व्या प्रयोगाकडे होणार आहे’, अशी प्रतिक्रिया नाटकाच्या दिग्दर्शिका दीप्ती जोशी यांनी व्यक्त केली. दीप्ती जोशी सांगतात, “नाटकाची शंभराव्या प्रयोगाकडे वाटचाल होतेय याचा दिग्दर्शक म्हणून मला आनंद आहे. मिलाप थिएटरचे हे पहिले व्यावसायिक नाटक आहे. या नाटकाशी संबंधीत असणारे आम्ही या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून ते आत्तापर्यंत प्रगल्भ होत चाललो आहोत. इतके या नाटकाने आम्हाला शिकवले आहे.
