मावळच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार माधवी जोशी यांची शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल.

 

पाली/बेणसे (धम्मशील सावंत)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वात राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात वंचितकडून लोकसभेच्या उमेदवारीची माळ सेवाभावी आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या माधवी ताई नरेश जोशी यांच्या गळ्यात पडली. आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांत आंबेडकरी बहुजन समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माधवीताई जोशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य दिव्य वाजत गाजत रॅली काढून घोषणाबाजी करून अफाट शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा निरीक्षक प्रियदर्शी तेलंग, रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, जिल्हा महासचिव वैभव केदारी, जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शारदा ताई बनसोडे, रामदास भगत, पँथर सुशील भाई जाधव यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीचे रूपांतर भव्य प्रचार सभेत झाले.यावेळी माधवी ताई म्हणाल्या की माझ्यावर बाळासाहेब आंबेडकर आणि जनतेने जो विश्वास दाखवला, तो विश्वास मी सार्थ ठरवेन. सौ. माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ग्रामीण, दुर्गम भागात पोहचून सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणास पूरक कार्य करीत आहेत. माधवी ताई नावाचे वादळ आता मतदारसंघात घोंगावत असून प्रचारादरम्यान गावोगावी जाऊन जनतेच्या समस्यांना जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका त्या घेत आहेत. प्रतिष्ठान च्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम आणि त्यांचे नियोजन ,लोकांच्या समस्येचे योग्य निवारण, लोकांच्या अपेक्षा आणि त्याची पूर्तता करण्याबाबतची अभ्यासपूर्ण चुणूक त्यांनी आपल्या कृतिशील कार्यातून दाखवुन दिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून कार्यरत असताना अनेक लोक या समाजकार्यात जोडले गेले आहेत. जनहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. सर्वांच्या सहकार्याने आमच्या या समाज कार्याची मशाल अखंड तेवत ठेवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असल्याचे माधवी ताई जोशी यांनी सांगितले. लोकसभेत जनतेने संधी दिल्यास या जनसेवेचा वेग अधिक गतिमान होईल असं ही जोशी म्हणाल्या. जनतेचे उत्स्फूर्त प्रेम आणि पाठिंबा असल्याने वंचित बहुजन आघाडीचा खासदार लोकसभेत जिंकून जाईल, आणि सर्वसामान्य, गोरगरीब , कष्टकरी श्रमजीवी वर्गाचा आवाज बुलंद करेल असा विश्वास यावेळी माधवीताई नरेश जोशी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *