सम्राट गायकवाडची जेलमध्ये रवानगी खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा: मानसिक त्रास झालेल्‍यांनी तक्रार देण्याचे आवाहन

सम्राट गायकवाडची जेलमध्ये रवानगी

चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’..

खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा: मानसिक त्रास झालेल्‍यांनी तक्रार देण्याचे आवाहन

सातारा -कुलदीप मोहिते

२० ते २५ हजार रुपयांची खंडणी मागून ती न दिल्‍याने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्‍याप्रकरणी सम्राट तुकाराम गायकवाड (सध्या रा.सदबझार, सातारा. मूळ रा.फलटण) याला पोलिसांनी अटक केली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर त्‍याला न्‍यायालयात हजर केले असता त्‍याची रवानगी सातारा जिल्‍हा कारागृहात केली. दरम्‍यान, गायकवाड याने ज्यांना त्रास दिला आहे त्‍यांनी तक्रारी देण्याचे आवाहन तक्रारदार यांनी केले आहे.

 

अमित लक्ष्मण वाघमारे (वय ३८, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित वाघमारे यांचे सातारा मिरर नावाचे यूट्यूब चॅनल आहे. पत्रकारितेच्या व्‍यवसयाच्या माध्यामतून त्‍यांची सम्राट गायकवाड याच्याशी ओळख होती. गायकवाड काेणत्‍याही दैनिकात अथवा चॅनेलमध्ये पत्रकारीता करत नाहीत. मात्र तो एका साप्‍ताहिकात असल्‍याचे समाजामध्ये सांगतो. गायकवाडने त्‍याच्या मोबाईलवरुन व स्‍वत:च्या व्‍हॉट्‌सअप स्‍टेटसवर अनेकदा वाघमारे यांना हीन दर्जाची वागणूक मिळेल अशी विधाने लिहली होती. गायकवाड याने मार्च २०२३ मध्येही पोलिस मुख्यालयासमोर जातीवाचक विधाने करुन अपमान केला होता. मात्र त्‍याने त्‍यानंतर माफी मागितल्‍याने वाघमारे यांनी तक्रार दिली नव्‍हती.

 

त्‍यानंतरही गायकवाड याने सातारा जिल्‍हा पत्रकार या व्‍हॉट्‌सअप ग्रुपवर व स्‍वत: मोबाईलवरील स्‍टेटसवर सतत जातीवाचक व हीन दर्जाची वागणूक मिळेल अशा पोस्‍ट केल्‍या होत्‍या. याशिवाय ‘सातार्‍यातील पत्रकार संघटनांच्या अध्यक्षांकडून मला पैसे मिळवून दे. पत्रकारीतेमुळे माझे आयुष्य उध्वस्‍त झाले आहे. माझी बायको मला सोडून गेली आहे. संघटनेचे अध्यक्ष असलेले हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी यांना अनेकदा पैसे मागूनही मला ते पैसे देत नाहीत’, म्‍हणून त्‍यांची बदनामी होईल अशा रितीने सातारा जिल्‍हा पत्रकार ग्रुपवर व माझ्या स्‍वत:च्या स्‍टेटसवर मी मेसेज टाकले आहेत. त्‍यांच्याकडून मला दरमहा २० ते २५ हजार रुपये घेवून दे. त्‍यांनी दिले नाहीतर तु मला पैसे दे, अशी धमकी गायकवाड याने सातारा-कोरेगाव रस्‍त्‍यावर मला भेटून दिल्‍याचे वाघमारे यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.

 

वाघमारे यांनी पैसे देण्यास नकार दिल्‍यानंतर गायकवाड याने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी देत ‘तुमच्या घरातील पोरी-बायकांना गायब करेन. त्‍यांच्या जीवाचे बरेवाईट करेन. हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी, प्रशांत पवार यांनी पैसे न दिल्‍यास त्‍यांनाही ठार मारेन अशी धमकीही माझ्या व माझा मित्र विठ्ठल हेंद्रे यांच्यासमाेर दिल्‍याचे वाघमारे यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी गायकवाड याच्या विरुध्द कलम ३८५, ५०४, ५०६ तसेच अनुसुचित जाती जमाती अत्‍याचार अन्‍वये गुन्‍हा दाखल करुन घेतला. दरम्‍यान, गुरुवारी गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर सातारचे पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी सम्राट गायकवाड याला अटक केली. शुक्रवारी सकाळी त्‍याला न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायाधिशांनी गायकवाड याची रवानगी सातारा जिल्‍हा कारागृहात केली. 

 

गायकवाडचा खंडणी मागून अनेकांना मानसिक त्रास..

सम्राट गायकवाड याच्या विरोधात यापूर्वीही पोलिस ठाण्यात तक्रारी आहेत. गेली काही वर्षे तो सातत्‍याने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस दलातील उच्च अधिकारी, प्रतिष्ठित व्‍यक्‍तींना वेगवेगळी कारणे देवून तो पैसे मागायचा. अनेकांनी अनेकदा त्‍याला मदतही केली. मात्र ज्यांनी मदत केली त्‍यांच्याही विरोधात गायकवाडने अनेकदा खालच्यापातळीवर जावून बदनामीकारक मजकूर लिहल्‍याचे पुरावे आहेत. रात्री, अपरात्री अनेकांना मानसिक त्रास देवून सम्राट गायकवाडने सातारा जिल्‍ह्यातील अनेक प्रतिष्ठितांची बदनामी केल्‍याचे पुरावे पोलिस ठाण्यात जमा करण्यात येत आहेत. ज्यांना ज्यांना गायकवाडने जाणीवपूर्वक त्रास दिला त्‍यांनी त्‍यांनी माझ्याप्रमाणे पोलिस ठाण्यात तक्रारी द्याव्यात, असे आवाहन तक्रारदार अमित वाघमारे यांनी केले आहे. तसेच गायकवाड याला असे मेसेज पाठवायला लावणार्‍यांची व अशा कृत्‍यात मदत करणार्‍यांची चौकशी करण्याची मागणीही वाघमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *