भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : दाशॊ छेरिंग तोबगे

Maharashtra Cultural Festival in Bhutan: Dasho Tshering Toge

मुंबई, १७ मार्च, :भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.

जानेवारी महिन्यात पंतप्रधान झाल्यावर आपल्या पहिल्याच भारत भेटीवर आलेले भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे व त्यांच्या पत्नी ओम ताशी डोमा यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शासनाच्या वतीने राजभवन, मुंबई येथे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईत आज फिक्कीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात टूर ऑपरेटर्स तसेच व्यापार व वाणिज्य प्रतिनिधींसोबत बैठक झाल्याचे सांगून महाराष्ट्र व भूतान मध्ये उभय पक्षी पर्यटन वाढविण्याबाबत आपण कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान छेरिंग तोबगे यांनी राज्यपालांना सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, भूतानचे परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धूनग्याल, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री ल्योंपो जेम शेरिंग, उद्योग आणि वाणिज्य आणि रोजगार मंत्री ल्योनपो नामग्याल दोरजी, भूतानचे भारतातील राजदूत मे.जन. वेटसोप नामग्येल, परराष्ट्र सचिव ओम पेमा चोडेन, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि निमंत्रित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *