Jijau Sanstha Nilesh sambare Palghar

७५ वर्षे वीज नसलेल्या पालघरच्या या गावात झाली पहिली पोलीस

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दह्याले हे आदिवासीबहुल गाव अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी या गावात वीज पोहोचली. आजही रस्ते, मोबाईल नेटवर्क, आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या संधी मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत वाढलेल्या बेबी सोमन हिने महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवत गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान पटकावला आहे. तिची कहाणी ही केवळ एका तरुणीच्या वैयक्तिक यशाची नाही, तर विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासी भागातील तरुणांच्या संघर्षाची आहे. वाचा बेबी सोमन हिचा संघर्षमय प्रवास…

“एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, ‘बेबी, तुझं नाव मेरिट लिस्टमध्ये आलंय.’ तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. इतका आनंद झाला की काही क्षण काय करावं, हेच सुचत नव्हतं. सर्वप्रथम आईला ही बातमी सांगावी म्हणून फोन लावला; पण आमचं गाव दुर्गम असल्याने तिथे नेटवर्कच नव्हतं. त्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मी आई-वडिलांपर्यंत लगेच पोहोचवू शकले नाही,” असं सांगताना बेबी सोमन आजही भावूक होते.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दह्याले या आदिवासीबहुल गावातील बेबी सोमन हिने संघर्षाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवलं. मात्र तिच्या यशाइतकाच तिच्या गावाचा प्रवासही संघर्षमय आहे. दह्यालेमध्ये केवळ मोबाईल नेटवर्कचीच समस्या नाही. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी, म्हणजे २०२२ मध्ये या गावात प्रथमच वीज पोहोचली. आजही गावातील नागरिकांना रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो.

अनुसूचित जमातींसाठी घटनात्मक आरक्षणाची तरतूद होऊन अनेक दशके उलटली असली, तरी दुर्गम आदिवासी भागातील तरुणांचे सरकारी सेवांमधील प्रतिनिधित्व आजही अत्यल्प आहे. शिक्षण, मार्गदर्शन, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही त्यामागची प्रमुख कारणे मानली जातात.

अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बेबी सोमन हिने दह्याले गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान मिळवला आहे. तिचं यश हे केवळ वैयक्तिक यश नाही; तर विकासापासून कोसो दूर राहिलेल्या आदिवासी समुदायाचं यश आहे.

या संघर्षमय प्रवासात तिला जिजाऊ या संस्थेची साथ लाभली. पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले महागडे क्लासेस लावणं बेबीला शक्य नव्हतं. जिजाऊ संस्थेच्या मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबाबत तिला एका मैत्रिणीकडून माहिती मिळाली. इथे प्रवेश घेतल्यानंतर तिला योग्य मार्गदर्शन मिळालं, ज्याच्या जोरावर तिचा पोलीस भरतीचा प्रवास अधिक सुकर झाला.

बेबीला एका प्रयत्नातच हे यश मिळालं नाही. याआधी तिला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. “तू कधी भरती होणार?” असा प्रश्न लोक सातत्याने विचारायचे. या सगळ्याचा तिच्यावर मोठा मानसिक दबाव होता. पण जिजाऊमधील शिक्षक तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच ती मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनली. अन्यथा हे यश मिळणं कठीण होतं, असं ती सांगते.

बेबीने रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास केला. मोबाईलपासून शक्य तितकं दूर राहिली. जास्तीत जास्त वेळ अभ्यासालाच दिला. त्यामुळेच ती या यशापर्यंत पोहोचली. योग्य संधी आणि अनुकूल वातावरण मिळाल्यास आदिवासी तरुण-तरुणी आपल्या गुणवत्तेचा झेंडा उंच फडकवू शकतात, हेच तिने सिद्ध करून दाखवलं आहे. परिस्थितीपुढे हताश न होता, त्यातून मार्ग काढत बेबीने हे यश खेचून आणलं आहे. तिचं यश इतर आदिवासी तरुण-तरुणींसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *