शहापूर तालुक्यातील रातांधळे येथील मयुरी बळीराम कलचिडा हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशानिमित्त आज गावातून भव्य रॅली काढण्यात आली. रातांधळे गावाच्या वेशीपासूनच या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत तिचे जंगी स्वागत केले.
त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा. निलेश सांबरे यांच्या हस्ते मयुरीचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील युवक-युवतींना मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण उपलब्ध करून देत अनेकांचे करिअर घडविल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने निलेश सांबरे यांचाही भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना निलेश सांबरे यांनी “ग्रामीण भागातील कोणताही तरुण किंवा तरुणी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहू नये, यासाठी जिजाऊच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे. मयुरीसारख्या विद्यार्थ्यांचे यश हेच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी या मातीत घडवण्याचा माझा संकल्प आहे. वीज, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम अधिकारी घडवणे गरजेचे आहे. शहापूरमध्ये मोफत रुग्णालय, मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, CBSE मोफत शाळा, तसेच NEET आणि JEE क्लासेस सुरू केले आहेत. आई-वडील नसलेल्या मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत.”
“मुलांनी टीव्ही आणि मोबाईलपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कलेक्टर, उपजिल्हाधिकारी आणि राज्याचा मुख्य सचिव आपल्याच मातीतून घडावा, हा आमचा संकल्प आहे. आजपासून प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास सुरू करावा,” असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या भावना व्यक्त करताना मयुरी कलचिडा म्हणाली, “पोलीस व्हावं हे माझ्या आई-वडिलांचं आणि भावाचं स्वप्न होतं. आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी अकॅडमी लावणे शक्य नव्हते. जिजाऊ अकॅडमीत मला मोफत प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास मिळाला. त्यामुळेच हे यश मिळवू शकले. यासाठी मी निलेश सांबरे सर आणि जिजाऊ परिवाराची मनापासून आभारी आहे.”
या सत्कार सोहळ्यासाठी रातांधळे तसेच परिसरातील गावांमधून नागरिक, युवक-युवती, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी मयुरीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत प्रशिक्षणामुळे अनेकांचे जीवन बदलत असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडला.
