Mumbai Local Train I एका पावसाने उडवला मध्य रेल्वेचा बोजवारा

वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती गेली वाहून

आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे सहा वाजेपासून कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. झाडंदेखील कोसळली आहेत. याशिवाय वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचल्याने वीज पुरवठा देखील बंद झाला आहे. त्यामुळे वासिंद-कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूकदेखील ठप्प झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, रविवारी विशेष मेगाब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येतो. मात्र मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने मेगा ब्लॉकदेखील रद्द करण्यात आला आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कल्याणच्या पुढे शहाड, अंबिवली, टिटवाळापासून कसारापर्यंत सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
दरम्यान, कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *