नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर ACB चा छापा; लाच प्रकरणी अधिकाऱ्याला अटक

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईत मंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.

35 हजारांची लाच स्वीकारताना कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मेडिकल लायसन्स (वैद्यकीय परवाना) निलंबन रद्द करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम 35 हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

गुरुवारी सायंकाळी सुमारे 6.06 वाजता आरोपीने मंत्रालयातील कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या ACB च्या पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणात राजेंद्र ढेरंगे यांचे नाव समोर आले असून, तसेच रामदास घाडे यालाही अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

या छापेमारीनंतर काँग्रेसने राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले की,

“महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”

सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी, संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती जनतेसमोर मांडावी आणि लाच प्रकरणाशी संबंधित मंत्र्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी केली आहे.

राजकीय परिणाम काय?

नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत. मंत्र्यांच्या खात्याच्या मंत्रालयातील कार्यालयात ACB ने छापा टाकल्याने सरकारची प्रतिमा डागाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, ACB कडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *