मा.खा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांच्या आत्मचरित्राचा पुणे येथे उत्साहात प्रकाशन सोहळा

“माझा संसदेतील प्रवास” आणि “पार्लियामेंट टू सुप्रीम कोर्ट” या ग्रंथांचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण

पुणे (विशेष प्रतिनिधी)

लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, संसदरत्न प्रो. डॉ. ॲड. सुनील बळीराम गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे येथे त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आपुलकीच्या आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

लेखक आणि डॉ. सुनील गायकवाड यांचे जिवलग मित्र कुंतल अरोरा यांनी त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर लिहिलेला “पार्लियामेंट टू सुप्रीम कोर्ट” हा ग्रंथ तसेच डॉ. गायकवाड यांचे आत्मचरित्र “माझा संसदेतील प्रवास” या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना डॉ. सुनील बळीराम गायकवाड म्हणाले,
“आयुष्यात काही नाती रक्ताची नसतात, पण ती मनाने जोडली जातात. कुंतल अरोरा यांनी माझ्या जीवनप्रवासाकडे पाहिलेला दृष्टिकोन, त्यांनी दिलेला सन्मान आणि प्रेम माझ्यासाठी आयुष्यभराची अमूल्य शिदोरी आहे. या प्रेमाची परतफेड शब्दांत कधीच होऊ शकत नाही. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.”

“जीवनाच्या प्रवासात मिळालेली माणसे, त्यांचे प्रेम, विश्वास आणि आपुलकी हीच खरी संपत्ती असते,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या सोहळ्याचे सुंदर नियोजन कुंतल अरोरा, सिमरन अरोरा आणि वंशिका अरोरा यांनी केले. कार्यक्रमात साहित्य, सामाजिक कार्य, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

मंचावर प्रमुख उपस्थित म्हणून सिने अभिनेते राणा जंग बहादूर, माजी मंत्री दिलीप कांबळे, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई, आर्मी अधिकारी पांडे, डी.वाय.एस.पी. फंड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिलकुमार गायकवाड सेवा कुंडचे अध्यक्ष अश्वजीत अनिलकुमार गायकवाड, उद्योजक जयश्री अनिलकुमार गायकवाड, विशाखा सुनील गायकवाड, सिमरन कुंतल अरोरा आणि लेखक कुंतल अरोरा उपस्थित होते.

विशेष आकर्षण ठरली ती डॉ. सुनील गायकवाड यांचे मोठे बंधू, एम.एस.आर.डी.सी. चे उपाध्यक्ष डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड आणि पूज्यनीय वहिनी जयश्री अनिलकुमार गायकवाड यांची उपस्थिती. कुटुंबीयांचा आशीर्वाद आणि स्नेहामुळे हा सोहळा अधिक भावनिक झाला.

कार्यक्रमाला शुभम गायकवाड, अभिजित गायकवाड, चित्रा गायकवाड, प्रियांका गायकवाड, रितिका गायकवाड, ललिता भगले, निवृत्ती भगले, संतोष चंद्रमणी, सुबोध लंगडे, संघविनय लंगडे, अशोक लंगडे, अनघा गायकवाड, रिया गायकवाड, अश्विका गायकवाड, त्रिशा गायकवाड, ॲड. अवचारे, प्रदीप बाबर, रमेश आगवाने, प्रा. रामेश्वर बद्दर, सेवा कुंडचे उपाध्यक्ष शहाडे तसेच सेवा कुंडचे सर्व पदाधिकारी व असंख्य स्नेहीजन उपस्थित होते.

संसद ते न्यायालयीन क्षेत्र, सामाजिक बांधिलकी ते सार्वजनिक जीवन असा प्रेरणादायी प्रवास मांडणारे हे दोन्ही ग्रंथ उपस्थितांसाठी एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरले.

डॉ. सुनील गायकवाड यांच्या जीवनातील संघर्ष, कर्तृत्व, समाजसेवा आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्याची ही शब्दरूप गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *